आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा दोन दिवस चालेल वन्यप्राणी प्रगणना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - काही वर्षांपासून वन्यप्राणी प्रगणनेत अनेकविध सुधारणा करण्यात आल्या असून, अत्याधुनिक ट्रान्झिट लाइन, ट्रॅप कॅमेरा पद्धतीने वाघांची निश्चित संख्या मिळवणे सुलभ झाले आहे. मागील काही वर्षांचा अनुभव घेता यंदा ही प्रगणना 4 आणि 5 मे अशी दोन दिवस करण्यात येणार आहे. त्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या निसर्गप्रेमींना वन्यजीव विभागाकडे नोंदणीचे आवाहनही करण्यात आले.
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांमध्ये वन्यप्राणी प्रगणना करण्यात येते. बुद्ध पौर्णिमा मे महिन्यात येत असून, या वेळी सर्वसाधारणपणे जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने ठरावीक ठिकाणीच वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध असते. अशा जलसाठ्यांचा शोध घेऊन त्या नजीकच्या झाडावर मचाणं बांधून पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद या पद्धतीत घेतली जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून नेमके बुद्ध पौर्णिमेला ढगाळ वातावरण, पाऊस, वादळवारा आल्याने प्रगणनेवर परिणाम झाला. त्यामुळे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीही पाणवठ्यावरील प्रगणना होईल.मुख्य वनसंरक्षकांमार्फत तसे निर्देश सर्व उपवनसंरक्षकांना, सहायक वनसंरक्षकांना प्राप्त झालेत.
त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी स्तरावर वन्यप्राणी प्रगणनेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या प्रगणनेत अभयारण्यातील पाणवठ्यांवर मचाण बांधून प्रत्येक मचाणावर एक वनकर्मचारी, एक निसर्गप्रेमी रात्रभर बसून वन्यप्राण्यांची नोंद घेतात.


२८ पर्यंत संपर्क साधा

येत्या 4 आणि 5 मे ला अकोला वन्यजीव विभागामार्फत काटेपूर्णा ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यप्राणी प्रगणना करण्यात येईल. इच्छूकांनी नावांची नोंदणी अकोला वन्यजीव विभाग अथवा त्या-त्या परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे २८ एप्रिलपूर्वी करावी.'' रमेशप्रसाददुबे, सहायक वनसंरक्षक, अकोला

या बाबींची घ्यावी काळजी

१)मचाणावर बसल्यानंतर आपसांत बोलू नये.
२) हिरव्या फांद्यांनी चांगले झाकून घ्यावे.
३) मचाणावर बसणाऱ्या व्यक्तींनी निसर्गाशी एकरूप होणारे कपडे घालावे.
४) भडक रंगाचे वस्त्र घालू नये.
५) नियोजित वेळेत मचाणावर बसावे.
६) उग्रवास असलेले सुगंधित द्रव्य कपड्यावर लावू नये.
७) रात्री सर्चलाइटचा वापर करू नये.
८) मचाणावरून वारंवार खाली उतरू नये.
९) पॉलिथीन सोबत बाळगू नये.