आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोकोल’ने हिरावला जनावरांच्या तोंडचा ‘घास’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पावसाळा तब्बल दीड महिना लांबल्याने जनावरांच्या चार्‍यापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. चार्‍याअभावी दोन दिवसांपूर्वी जिल्हय़ातील अनेक जनावरे कुपोषित होऊन मेली. मात्र, अशातच उपलब्ध असलेल्या गुरांचा चारा कोळसा बनवण्यासाठी बायोकोल कंपन्या विकत घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शेतातील चारा-कुटार हे गुराढोरांसाठीच वापरल्या जाते, यावर कुणीही विश्वास ठेवेल. मात्र, त्याच चाराकुटाराचा वापर कोळसा बनवण्यासाठी होत असेल, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. एमआयडीसीमध्ये चार ते पाच कंपन्या हा चारा विकत घेऊन त्यापासून कोळसा तयार करत आहेत. हाच कोळसा बाहेर पाठवला जाऊन येथील जनावरांना मात्र मृत्यूच्या खाईत लोटत आहे. महिनाभरापासून जनावरांना पोटभर चारा नाही. त्यातच दोन दिवस सतत पाऊस आल्याने त्यांची प्रतिकार शक्ती कमी होऊन जिल्हय़ात गुरुवारी आणि शुक्रवारी 70 ते 75 जनावरांचा मृत्यू झाला. हा मृत्यू नेमका कशाने झाला, याचे निदान अजूनही जिल्हा प्रशासनाने काढले नसून, प्रशासन मात्र सुन्न आहे. राज्यभर जनावरांच्या चार्‍याच्या छावण्या लागल्या. मात्र, जिल्हय़ामध्ये कुठल्या प्रकारचे नियोजन नसल्यामुळे जिल्हा प्रशासन गुरा-ढोरांना चारा उपलब्ध करण्यात अपयशी ठरल्याने, दररोज जनावरांचा मृत्यू होत असून, पशुधन मालकावर दुष्काळात तेरावा महिना आल्याची परिस्थती निर्माण झाल्याने तो संकटात आला आहे.

कंपन्या लावतात चाराकुटाराची बोली
एमआयडीसीमध्ये जवळपास 4 ते 5 बायोकोल कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये कोळसा निर्मितीसाठी इतर कच्च्या मालासोबतच अँग्रिकल्चर वेस्टच्या नावाखाली चाराकुटाराचा वापर केल्या जातो. त्यामुळे अनेक वर्षांपासून या कंपन्या जनावरांचा चारा पळवत आहेत. कंपन्यांकडूून चाराकुटाराला अधिक भाव मिळत असल्यामुळे शेतकरीसुद्धा त्यांना चारा विकतो.
जिल्हा प्रशासन चारा छावण्या केव्हा उघडणार ?
जून महिना कोरडा गेल्याने गवत उगवले नसल्यामुळे चार्‍याचा भीषण प्रश्न निर्माण झाला. परिणामी, शेती पिकातून मिळणारा चारा व हिरवा चारा जनावरांना मिळाला नाही. शेतातील चाराकुटार मोठय़ा प्रमाणात बायोकोल कंपन्याकडे जात असल्याने चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, जनावरांना चारा मिळत नसल्याने जनावरे अशक्त झाली असून, ती मृत्युमुखी पडत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे, गुरुवारी शिवणी, शिवर परिसरात 42 जनावरांचा मृत्यू होय. असे असतानाही प्रशासनातर्फे जिल्ह्यात चारा छावण्या उघडण्यात आल्या नाहीत.’’ नीलेश डेहनकर, सदस्य, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती.

ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा जिल्ह्यात चारा उपलब्ध
जिल्हा परिषदेतील 53 सर्कलनुसार चारा छावण्या उघडण्यासाठी जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या या अहवालानुसार अकोला जिल्ह्यातील जनावरांना ऑगस्ट महिन्यापर्यंत चारा पुरणार असल्याचे सांगण्यात आले होते. सध्या जनावरांना पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. जिल्ह्यामध्ये चाराटंचाईची स्थिती सध्या नाही. त्यामुळे अकोला जिल्ह्यात अद्यापही चारा छावण्या उघडण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. याकडे आमचे लक्ष आहे.’’ डॉ. के. मेहरे, पशुधन विकास अधिकारी.

नाइलाजास्तव कंपन्यांना विकावा लागतोय चारा
शेती उत्पादनातून निघालेले चाराकुटार जनावरांचा चारा म्हणून मोठय़ा प्रमाणात साठवल्या जातो. मात्र, उर्वरित वेस्ट कोणीच विकत घेत नसल्याने टाकून द्यावे लागते. बायोकोल कंपन्यांना या वेस्टची कोळसा निर्मितीसाठी गरज असल्याने या कंपन्या शेतकर्‍यांकडून ते विकत घेतात. अतिरिक्त साठवणूक म्हणून हा वेस्ट कोणी विकत घेत नसल्याने नाइलाजास्तव बायोकोल कंपन्यांना विकल्या जातो. कंपन्यांकडून जास्त पैसे मिळत असल्याने शेतक री चाराकुटार विकणे पसंत करतो.’’ एक शेतकरी