आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यामध्ये ‘अण्णां’चे कार्यकर्ते करणार ‘आप’सोबत कार्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासचे बहुतांश सदस्य हे आम आदमी पार्टी (आप) आणि न्यास अशा दोन्ही चळवळीत कार्य करणार आहेत. रविवारी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यावर आम आदमी पार्टी सोमवारी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

‘आप’द्वारे अकोल्यातही सदस्य नोंदणीला प्रारंभ करण्यात आला. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासशी जुळलेले अनेकजण ‘आप’चे सदस्य झाले आहेत. मात्र, आता न्यासमध्ये सक्रिय असलेले ‘आप’चे होणार काय, याकडे लक्ष लागले असतानाच रविवारी न्यासच्या स्वयंसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीत 70 स्वयंसेवक उपस्थित होते. यापैकी 67 जणांनी दोन्हीकडे कार्य करण्याच्या बाजूने कौल दिला. हे 67 जण ‘आप’ने निवडणूक लढवल्यास त्यांच्याकडून कार्य करणार आहेत.

समान उद्देश
दरम्यान, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास आणि ‘आप’चे उद्देश, ध्येय समान आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला बळच मिळेल, अशी प्रतिक्रिया न्यासचे कार्यकर्ते गजानन हरणे यांनी दिली.