आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anna Hazare News In Marathi, Anti Corruption Agitation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर लढा - अण्‍णा हजारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूरबाजार - जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. पण, सत्ताधार्‍यांना हे कधी कळलेच नाही. यापुढे भ्रष्टाचार आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर आपला लढा राहणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी केले.
प्रहार संघटनेच्या वतीने चांदूरबाजार येथील कृषिउत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर शेतकरी परिषद, जाहीर सभा आणि अण्णा हजारे यांच्या रक्ततुलेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अण्णा हजारे पुढे म्हणाले, अन्न व पाणी हे अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक आहेत. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही राज्यकर्त्यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी लाभ होऊ दिला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तरुण पिढीने जागृत होणे गरज आहे.
वेळप्रसंगी भारतमातेच्या संरक्षणासाठी तुरुंगात जाण्याची तयारी तरुणांनी ठेवली पाहिजे. यासाठी निष्कलंक जीवन, आचार-विचार, प्रसंगी अपमान पचवण्याची व त्यागाची तयारी आजच्या तरुणामध्ये असायला हवी. शेतकर्‍यांचे संघटन करण्याकरिता देशभर फिरून 100 बच्चू कडू कसे मिळतील, याचा शोध मी घेत आहे. ते नक्कीच मिळतील, अशी आशाही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील साडेतीन लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. त्यामुळे शेतकर्‍यांच्या विकासाचे धोरण निश्चित करण्याची गरज आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. या वेळी व्यासपीठावर शेतकरी नेते विजय जावंधिया, एचएमटी तांदुळाचे जनक दादाजी खोब्रागडे, बाजार समितीचे सभापती मंगेश देशमुख, प्रहारचे विदर्भप्रमुख संजय देशमुख, नगराध्यक्ष सरोज हरणे, पंचायत समितीच्या सभापती सविता बर्वे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाला शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
..तर शेतकरी सरकार उलथून टाकल्याशिवाय राहणार नाहीत : स्वातंत्र्याच्या 65 वर्षांनंतरही शेतकर्‍यांची लूट बंद झाली नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेत रोज कुठे ना कुठे भ्रष्टाचार होत आहे. शेतकर्‍याच्या हिताचे राजकारण केले जात असल्याने त्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यापुढे शेतकर्‍यांच्या मालाला भाव दिला नाही, तर शेतकरीविरोधी सरकार उलथून टाकल्याशिवाय शेतकरी राहणार नाहीत, असे शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी मत व्यक्त केले.
631 शेतकर्‍यांच्या रक्तदानातून अण्णांची रक्ततुला : दुपारी अडीच वाजता अण्णा हजारे यांचे चांदूरबाजार शहरात आगमन झाले. या वेळी शहरातून दुचाकीची फेरी काढून अण्णांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. यानंतर तीन कोटी 59 लाख रुपयांच्या बाजार समितीच्या विकासकामांचे भूमिपूजन अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी 631 शेतकर्‍यांच्या रक्तदानातून अण्णा हजारे यांची रक्ततुला करण्यात आली.