आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aricle By Suhas Kulkarni On Chotu Bhaiyya Morshikar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोर्शीकर शिक्षण तज्ज्ञच नव्हे, तर चालते बोलते होते विद्यापीठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासोबत सुहास कुलकर्णी मोर्शीकर सर.)
सुहास कुळकर्णी
अकोला- पांढरा सदरा, एकटांगी धोतर, काळी सावळी अंगकाठी, तजेलदार नाक, मोठे डोळे, कुरळे केस असे छोटूभय्या मोर्शीकर. न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. आजन्म ब्रह्मचारी असणाऱ्या मोर्शीकरांनी अविरत ज्ञानोपासना आणि सदैव ज्ञानदान यामध्येच आयुष्य घालवले. त्यांच्या आयुष्याच्या महावस्त्राला समाजसेवेची भरजरी किनार होती. आधुनिक काळातले ते ऋषीच होते.
वै कुंठभूमीत छोटूभय्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत होते. मला त्यांचा सहवास आठवत होता. अकोल्याचा रहिवासी झाल्यापासून जवळपास ३३ वर्षे त्यांचा सहवास लाभला. मला आठवले, क्रांतिकारक मुनी गुरुजींच्या सत्कारासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आले हाेते. गझनीने उद््ध्वस्त केलेल्या सोरटी सोमनाथांच्या भव्यदिव्य मंदिराचे पुनर्निर्माण भारत सरकारने केले. त्या मंदिरात भगवान शिवाची स्थापना करण्याचे पौराेहित्य करणारे तर्कतीर्थ म्हणजे प्रचंड विद्वत्तेचे साक्षात स्वरूप. त्यांची मुलाखत घेण्याचे मनात आले. पण, त्यांची मुलाखत घेणे माझ्यासाठी अग्निदिव्यच. छोटूभय्यांना म्हणालो, सर या महापंडिताची मुलाखत घेण्याची इच्छा आहे. पण, मला भीती वाटते. सरांनी माझा हात ओढतच नेले आणि तर्कतीर्थांजवळ उभे केले. आमच्या सुहासला तुमची मुलाखत घ्यायची आहे. आचार्य, आपण कृपया वेळ द्या. सर म्हणाले. वेळ निश्चित झाली. मी मात्र घामाघूम. पाठीवर हात ठेवत गुरुजी म्हणाले, ते महाविद्वान असले तरी माणूसच आहेत. तुझ्या वाचनामुळे वेदापासून ते राजकारणापर्यंत त्यांना तू प्रश्न विचारू शकतो, असा माझा विश्वास आहे. सरांच्या बोलाने मला धीर आला. मुलाखत चांगलीच रंगली. लोकसत्तेत छापून आली. हे श्रेय छोटू भय्यांचे.
निसर्गाची संवाद हे या ऋषीवराचे खास वैशिष्ट्य. एके दिवशी त्यांना भेटायला गेलो, तर गच्चीवर पसरलेल्या निंबोळ्यांतून चांगल्या निंबोळ्या वेचणारे सर आपल्या कामात मग्न होते. अरे, आला का तू, असे म्हणत उठले आणि पिण्यासाठी पाणी घेऊन आले. अरे, सुहास मागच्या वर्षी सातशे झाडे लावली. या वर्षी दीड हजारांचा आकडा पार करावयाचा आहे. त्याची ही तयारी. रोप मी तयार करतो. सर सांगत होते. रस्त्यावरच्या बिस्लरी बाटल्या जमा करून त्यांचे तोंड कापून त्यान रोपे तयार करणे, नंतर ही रोपे सायकलवर नेणे, खड्डे करणे, दोनचार जण हाताशी घेणे, रोपे लावणे, हे कष्ट सत्तरी गाठलेला हा वृद्ध घेतो. येणाऱ्या पिढीला सावली मिळावी म्हणून त्या ऋषीवरांचे हात राबत होते. तुमच्या वृक्षारोपणाबाबत पत्रकारांना सांगा, असे म्हणताच सर दिलखुलास हसले. प्रत्येक कामाला प्रसिद्धी मिळवत मला राजकीय पुढारी व्हायचे नाही. कणखर आवाजात सर उद््गारले.
साहसवीर धनंजय भगत यांच्या अजिंक्य साहसी संघाचे सर निष्ठावंत कार्यकर्ते. २००९ मध्ये या साहसी संघाने अपंगांचे शिबिर कोकणात आयोजित केले. याच दौऱ्यात घडलेला एक प्रसंग, तर मी कधीही विसरू शकत नाही. अंबोली घाटातील प्रसिद्ध अंबोली धबधबा हा व्हॅली क्रॉसिंगसाठी धनंजयने निवडला. चारशे फूट उंचीवर तीनशे फुटाचे हे व्हॅली क्रॉसिंग ठेवण्यात आले. दोर बांधले. माझे तर डोळे फिरत होते. सर म्हणाले, घाबरतो का सुहास. जीवनाचे महावस्त्र हे अनुभवाने विणल्या जाते, असे बोलून हा म्हातारा तरातरा डोंगर चढला. त्यांच्या मागे मी चढू लागलो. छायाचित्रकार माधव देशमुख गालातल्या गालात हसत शूटिंग करू लागला. लगेच सरांनी व्हॅली क्रॉसिंग केले.
त्वमेव माताच पिता त्वमेव अशी निष्ठा त्यांची भगवतगीतेवर होती. बह्मविद्येच्या योगशास्त्राचे उपनिषद हा गीतेचा गद्य अनुवाद मराठी, हिंदी, इंग्रजी अर्थासह त्यांनी केला. हा ग्रंथ फडताळात पडून होता. प्रकाश अंधारे हे मोर्शीकरांचे चेले. त्यांनी या ग्रंथाला प्रकाशित केले. आता उर्दू भाषेसह नवीन आवृत्ती येत आहे. कृष्णाजी जोशी शिक्षाशास्त्री बी.एड. महाविद्यालयात गीता जयंतीचे प्रमुख वक्ते म्हणून मोर्शीकरांना बाेलावण्यात आले. नेमक्या शब्दात देखणे प्रवचन सरांचे झाले. गीतेवरील ग्रंथाचे लेखक म्हणून काका जाेशींनी मोर्शीकरांना शाल श्रीफळ देऊन गौरवले. या वेळी सरांनी आपला ५० हजार रुपयांचा ग्रंथसंग्रह महाविद्यालयाला सप्रेम भेट म्हणून जाहीर केला. कार्यक्रमानंतर सर मला म्हणाले, काकांनी आदराने अर्पण केलेली प्रेमाची शाल महत्त्वाची. मोर्शीकर शिक्षण तज्ज्ञच नव्हे तर चालते बोलते विद्यापीठ हाेते. सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला जीवन आणि सृष्टीवर रसरसीत प्रेम कसे करावे, याची दीक्षा त्यांनी दिली. या दीक्षेने कृतकृत्य झालेले धन्यतेचा अनुभव घेत आहेत. मोर्शीकरांचा देह गेला, पण त्यांचे विचार कायम आहेत.