आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतण्याचे भांडण सोडवणे काकाच्या बेतले जीवावर; दोघांच्या सशस्त्र हल्ल्यात पुतण्या गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पुतण्याचे भांडण सोडवण्यास गेलेल्या काकांचा खून झाल्याची घटना घुसर येथे 30 जुलै बुधवार रोजी सकाळी 6.30 वाजता घडली. पुतण्या गोपाल ठाकरेवर (वय 32) आज पहाटे प्राणघातक हल्ला झाला. यामध्ये त्याचा बचाव करणारे काका भानुदास ठाकरे (वय 45) यांचा नाहक जीव गेला. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर संतोष (35) व गजानन पागृत (32) यांना अटक केली असून, एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. तर जखमी गोपाल ठाकरेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
अकोला ते आपातापा मार्गावर असलेल्या घुसरच्या बसस्थानकावर गोपाल ठाकरे व संतोष पागृत यांच्या पानटपर्‍या आहेत. दोघांचेही अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. 29 जुलै रोजी रात्री बसस्थानकावर दोघांमध्ये वाद झाला. बुधवारी सकाळी 6.30 वाजता गोपाल ठाकरे नेहमीप्रमाणे दुकान उघडून दुकानात बसत नाही तर त्याच्यावर संतोष पागृत व गजानन याने हल्ला केला. पुतण्याचा झालेला वाद मिटवण्यासाठी व मध्यस्थ म्हणून आलेले गोपालचे काका भानुदास ठाकरे यांच्या पोटात व मानेवर कुर्‍हाडीने पागृत बंधूंनी हल्ला केला. यात ठाकरे परिवारातील दोघेही रक्तबंबाळ झाले. ऑटोचालकांनी दोघांना खासगी रुग्णालयात भरती करण्यासाठी धाव घेतली. मात्र, रस्त्यातच भानुदास ठाकरे यांची प्राणज्योत मालवली. गोपाल ठाकरेच्या पोटावर गुप्तीने वार केलेले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
दोन्ही घरांवर शोककळा
मूळ बहिरखेड येथील भानुदास ठाकरे व्यवसायानिमित्त घुसर येथे राहत होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. तर गोपाल ठाकरे यांच्या कुटुंबात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ मोठा मंगेश व लहान सतीश यांचा समावेश आहे. पानटपरी व्यवसायातून मिळणार्‍या उत्पन्नातून परिवाराचा उदरनिर्वाह होत असे. आता दोन्ही घरांवर शोककळा पसरली आहे.
साक्षीदार म्हणून पुढे येण्यास नकार :
या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी म्हणून व पोलिस तपासात साक्षीदार म्हणून कोणी पुढे येण्यास तयार नव्हते. गावात बुधवारी भीतीचे वातावरण असल्यामुळे पुरुषांनी शेतीची कामे सोडून गावात थांबणे पसंत केले. कुठल्याही राजकीय नेत्याने गावाला भेट दिली नाही.
भानुदासच्या मृत्यूने गावात हळहळ : बसस्थानकाजवळच भानुदास ठाकरे यांचे पंक्चर दुरुस्तीचे दुकान होते. ते अत्यंत मनमिळावू व शांत स्वभावाचे होते. कुणाच्याही मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे पुतण्याच्या वादात झालेली त्यांची हत्या गावातील तरुणांसह ज्येष्ठांच्या मनाला चटका लावून गेली.
गावात शांतता, पोलिसांच्या फेर्‍या
आज सकाळी झालेल्या घटनेमुळे गावात शांतता होती. तरुणांमधील वादाचे हत्याकांडात रूपांतर होईल, अशी पुसटशी कल्पना गावकर्‍यांना नव्हती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करत संतोष ठाकरे, त्याचा भाऊ गजानन ठाकरे या दोघांना अटक केली. संतोषचा नातेवाईक दीपक भांबेरे याची चौकशी पोलिसांनी केली. घटनेनंतर पोलिस पाटील संतोष भिसे यांनी अकोटफैल पोलिसांना माहिती दिली. हत्येनंतर घुसर येथे जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श, उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह जाधव, अकोटफैल पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी भेट दिली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिसांनी गावात गस्त घालून केला.