आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाण्यांची कृत्रिम टंचाई; ग्राहक त्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुट्या नाण्यांची कृत्रिम टंचाई भासत आहे. यामुळे किरकोळ व मोठे व्यापार्‍यांना अडचण निर्माण होते याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहकांनाही सोसावा लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिक दररोज बाजारासह विविध कामांसाठी शहरात येतात. यातून बाजारपेठेत दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, या उलाढालीत सुट्या पैशांची देवाणघेवाण करताना चणचण भासत आहे.
भाजीपाला विक्रेते, किराणा व्यावसायिक, चहा व नाष्टा हॉटेल्स, मेडिकल, पेट्रोलपंप व इतर महत्त्वाच्या ठिकाणी मालकांकडे ग्राहकांना देण्यासाठी सुटे पैसे मिळत नसल्याने ग्राहकांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागतो. सर्वसामान्य ग्राहकांना 2 ते 5 रुपयांच्या खरेदीसाठी विनाकारण दहा रुपयांची नोट खर्च करावी लागते. पन्नास पैसे व एक रुपयाच्या नाण्यांची सर्वाधिक कृत्रिम टंचाई आहे. नाणेटंचाईचा फायदा घेत काही व्यापारी आठ ते दहा रुपये शेकडा दराने कमिशन घेऊन सुटे पैसे देताना दिसतात. यामुळे काही किरकोळ व्यावसायिक सुटे नाणे गोळा करून कमिशनचा व्यवसाय करतात.
लहान मुलांच्या मनी बॅंक आणि धार्मिक स्थळांमध्ये ठेवण्यात आलेल्या दान पेट्यांमध्येही मोठय़ा प्रमाणावर चिल्लर गोळा होते. ही चिल्लर बाजारात येण्यास वेळ लागतो. कारण मुलांची मनी बॅंक पुर्ण भरल्याशिवाय उघडण्यात येत नाही. तसेच धार्मिक ठिकाणी ठेवलेल्या दानपेट्याही ठराविक कालावधीनंतर उघडण्यात येत असल्यामुळे त्यातील सुटी नाणी व्यवहारात येण्यास विलंब होतो. परिणामी चिल्लर नाण्यांची टंचाई भासते.
चॉकलेटचा पर्याय
काही दुकानदार सुटे पैसे नसल्यामुळे ग्राहकांच्या माथी सुट्या पैशांऐवजी चॉकलेट, काडीपेटी, चुनापुडी किंवा इतर किरकोळ वस्तू मारतात. कॉइन बॉक्सवरून फोन लावताना संबंधित मालक सुटे पैसे द्यायला नकार देतो. अनेक ठिकाणी सुट्या पैशांची गरज भासते. रेल्वेचे तिकीट घेताना प्रामुख्याने दोन व पाच रुपये परत द्यायला नसतात.