अकोला - कृत्रिमरीत्या आंबा पिकवणार्यांवर आता अन्न व औषध प्रशासन विभाग करडी नजर ठेवून आहे. कच्चा आंबा स्वस्त दरात विकत घेऊन तो रासायनिक पावडरच्या साहाय्याने पिकवून जनतेच्या जीवाशी खेळणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश विभागातील सहायक आयुक्तांना अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी दिले आहेत.
हल्ली ऋ तुमानानुसार आंब्याचे दिवस आहेत. बाजारात सगळीकडे बाजारपेठा आंब्याने फुलून गेल्या आहेत. दरवर्षींच्या तुलनेत यंदा आंब्याचे भावही कमी आहेत. त्यामुळे ग्राहक बाजारात गेल्यावर आंबा खरेदी न करता घरी येईल, असे क्वचितच घडते. त्याचा फायदा घेत आंबा विक्रेते पाडावर आंबा पिकवण्यापूर्वी कैरी असतानाच त्याच्यावर रासायनिक पावडरची प्रक्रिया करून मोठय़ा प्रमाणात आंबे पिकवत आहेत. उन्हाळय़ाचे दिवस असल्यामुळे हा आंबा आरोग्यास धोकादायक आहे. भारतीय हापूस आंब्यांना युरोपीय बाजारात बंदी घालण्यात आली आहे. त्याचा फायदा उचलत काही व्यापारी कच्चा आंबा खरेदी करून कृत्रिमरीत्या आंबे पिकवत आहेत. गेल्या आठवड्यात बाळापूर येथे मोठय़ा प्रमाणात रासायनिक पावडरने पिकवलेला आंबा अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून नष्ट केला. नष्ट करण्यात आलेल्या आंब्यावर रासायनिक प्रक्रिया केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आंबा कच्चा असताना त्याच्यावर कार्बाइड गॅसचा मारा करून तो पिकवल्या जातो. या प्रक्रियेत उष्णता निर्माण होऊन आंबे पिकवल्या जातात. काबाइड गॅस शरीराला अपायकारक असतो. काही व्यापारी हे कार्बाइड गॅसचा वापर करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत असतात. याची दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने विक्रेत्यांची तसेच ठोस व्यापार्यांची बैठक बोलावणे आवश्यक आहे. मात्र, त्याची तसदी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कधी घेतली जात नाही. अन्न सुरक्षा व मानके कायदा नियम 2006 व नियमन 2011 नुसार कार्बाइड पावडचा वापर करून आंबा पिकवण्यास प्रतिबंध आहे. मात्र, जिल्हय़ात बाळापूर येथील कारवाईचा अपवाद वगळल्यास अन्न प्रशासन विभाग हातावर हात देऊन बसल्याचे दिसून येत आहे.
कसा ओळखावा पाडाचा आंबा
कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याला उग्र वास येतो. तसेच या आंब्याचा काही भाग पांढरा होत असतो. जर असा पांढरा रंग आल्यास त्यावर कार्बाइड गॅसचा मारा केला हे सिद्ध होते. तसेच आंब्याची चवही बिघडते.
कार्बाइडने फळ पिकवणार्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यात आता आंब्याचे दिवस असल्यामुळे आम्ही आंब्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ग्राहकांना माहिती मिळाल्यास त्यांनी आम्हाला कळवावे, कारवाई केली जाईल. नीलेश ताथोड, अन्न निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग