आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asadgarh Fort Can\'t Conservation Akola Municipal Corporation

अकोल्‍यातील ‘असदगड’ किल्‍ल्‍याचे अवशेष पतंग उडविणा-यांसाठी ‘डेंजरस’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जुने शहरातील असदगड किल्ल्याचे जतन करण्यात महापालिकेला अपयश आले. त्यामुळे किल्ल्याची सध्या दुरवस्था झाली असून, शिल्लक अवशेष ‘डेंजरस’ स्थितीत आहे. त्या किल्ल्यावर लहान मुलांचा पतंग उडवण्यासाठी धोकादायक वावर सुरू असून, त्याकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे.
शहरातील राजेश्वर मंदिरापुढे असलेला ऐतिहासिक असदगड किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा किल्ला तीन बाजूने खचला आहे. कठडे तुटलेले आहे. महापालिकेने किल्ल्याच्या अवशेषांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जुने शहर-हरिहरपेठला जोडणार्‍या रस्त्याच्या बाजूने किल्ल्याच्या अवशेषाचा भाग आहे. त्याचा अर्धा भाग कोसळलेला असून, अर्धा कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्याच्या खाली काही व्यावसायिकांनी दुकानेही थाटलेली आहे. किल्ल्याचा भाग कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असदगड किल्ल्याच्या अवशेषावरून सध्या मुले पतंग उडवण्याचा आनंद घेत आहेत. मात्र, त्या किल्ल्याला तीन बाजूने कठडे नाहीत, असलेले कठडे तुटलेले आहेत. मुले कटलेले पतंग पकडण्यासाठी किल्ल्याच्या तुटलेल्या अवशेषावर धावतात. परिणामी, एखाद्यावेळी दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका प्रशासनाने दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
आझाद उद्यानाची निर्मिती
नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष विनयकुमार पाराशर यांच्या कार्यकाळात नगरपालिकेने या किल्ल्याची पुनर्बांधणी व उद्यानाचे काम केले होते. आझाद पार्क असे त्याचे नामकरण केले होते.
7 मे 1957 ला त्याचे काम सुरू झाले होते. या कार्यात 20 हजार 951 कामगारांनी सहभाग घेतला होता. यावर नगरपालिकेने त्या वेळी 1 लाख 11 हजार 404 रुपये खर्च केले होते. मात्र, महापालिकेने या वास्तूकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
पाठपुरावा करू
असदगड ऐतिहासिक वास्तू आहे. किल्ला दुरुस्तीसाठी तत्कालीन मनपा आयुक्त दीपक चौधरींच्या कार्यकाळात शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव दिला होता. त्याच्या जतनासाठी पुढाकार घेणार आहे.’’ रफिक सिद्दीकी, उपमहापौर, मनपा,
किल्ल्यावर सुरक्षा रक्षकच नाही
असदगड किल्ल्यावर सुरक्षा रक्षकही महापालिकेने नियुक्त केलेला नाही. त्यामुळे किल्ल्यावर गैरप्रकारदेखील सुरू राहत असल्याचे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. किल्ल्याची दुरुस्ती करून तत्काळ सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
असदगडचा इतिहास
मोगल सम्राट औरंगजेबाने तत्कालीन अकोला गाव आपले दिवाण असदखाँ यांना बक्षीस दिले होते. असदखाँने 1697 मध्ये ख्वाजा अब्दुल लतीफ यांच्या देखरेखीखाली अकोला गावाच्या चारही बाजूस भिंत मोठी उभारली होती. त्याला मोठे दरवाजे ठेवले होते. त्या दहिहंडा वेस, बाळापूर वेस, अगरवेस, गंजवेस या नावाने प्रसिद्ध आहेत. गावाच्या संरक्षणासाठी तीन बुरूजही बांधले होते. ज्यांना पंच बुरूज, अगरवेस बुरूज आणि असद बुरूज या नावाने ओळखतात. या तीन बुरुजांपैकी असद बुरूज हा सर्वात मोठा असल्याने याला असदगड किल्ला म्हणतात.