अकोला- रेल्वेच्या प्रवासी व माल भाड्यात वाढ झाल्याने याविरोधात सर्वत्र शुक्रवारी पडसाद उमटले. स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी याविरोधात आंदोलन केले. गाढवाच्या गळ्यात केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा फोटो लावत या गाढवाची स्वराज्य भवनापासून मदनलाल धिंग्रा चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीत दावेदार असलेल्या युवा नेत्यांनी हे आंदोलन केले. मात्र, त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची वानवा होती.
केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी प्रवासी भाड्यामध्ये 14 टक्के आणि मालवाहतुकीत 6 टक्के वाढ केली. या निर्णयाच्या विरोधात स्थानिक काँग्रेसच्या युवा नेत्यांनी शनिवारी आंदोलन केले. अकोला लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश गणगणे, प्रदेश युवक काँग्रेसचे डॉ. झिशान हुसेन, शहर काँग्रेसचे महासचिव कपिल रावदेव, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. स्वाती देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. पण, या आंदोलनात कार्यकर्त्यांची वानवा स्पष्टपणे दिसत होती. नेते अधिक झाल्याने कार्यकर्त्यांची कमी या आंदोलनात जाणवत होती. केवळ गाढवाच्या गळ्यातील पाटीच काय ती आंदोलनात आकर्षक दिसत होती. या आंदोलनात तश्वर पटेल, संजय देशमुख, सोमेश डिगे, पराग कांबळे, राजू नाईक, राहुल वानखडे, उज्ज्वल उगले, इर्शाद खान, गणेश कळसकर आदींचा समावेश होता.
काँग्रेस रस्त्यावर
रेल्वे भाडेवाढीचा विरोध करण्यासाठी काँग्रेसमध्ये एकोपा नसल्याचे चित्र होते. गांधी चौकात रास्ता रोको करण्यात आला. शहर अध्यक्ष मदन भरगड, माजी आमदार अजहर हुसेन, बबनराव चौधरी, डॉ. सुधीर ढोणे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. पण, या आंदोलनात कार्यकर्त्यांची वानवा दिसत होती. केवळ हातात काँग्रेसचे झेंडे घेत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी झाली.