आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर विद्रूप करणारे फलक लावणा-यावर होणार कारवाई, महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने दिली माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विधानसभा निवडणुकीत मंजूर जागेव्यतिरिक्त जाहिरातीचे फलक लावू नयेत. या अनुषंगाने संबंधित सर्वच राजकीय पक्षांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, दुसऱ्या नोटीसदरम्यान फलक काढल्या गेल्यास महाराष्ट्र विद्रूपीकरण कायदा 1995 कलम अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने दिली.
विविध उत्सव तसेच वाढदिवसानिमित्त शहरात सर्वत्र फ्लेक्स लावले जातात. या प्रकारामुळे शहराचे विद्रूपीकरण होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी १९९५ ला कायदा करण्यात आला. आता विधानसभा निवडणुकीमुळे पुन्हा फ्लेक्सचा बाजार भरला आहे. फ्लेक्स लावताना महापालिकेची मंजुरी घेणे गरजेचे आहे. राजकीय पक्ष ही मंजुरी घेतात. मात्र, मंजूर जागेऐवजी हे फलक वेगळ्याच ठिकाणी लावले जातात. त्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे, तसेच शहराचे विद्रूपीकरणही वाढत आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने दहा ऑक्टोबरला अशा फलकांची पाहणी करून संबंधितांना नोटीस बजावल्या. या नोटीसनंतर फलक काढण्याचे काम विविध राजकीय पक्षांनी सुरू केले आहे. परंतु, जे राजकीय पक्ष चुकीच्या ठिकाणी अथवा वाहतुकीत अडथळा आणणारे ठरतील, असे फलक लावणाऱ्यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावल्या जाईल. दुसऱ्या नोटीसच्या वेळी मात्र महाराष्ट्र विद्रूपीकरण कायदा १९९५ अन्वये संबंधितावर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेतील अतिक्रमण हटाव विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे अाता मंजूर जागेव्यतिरिक्त जाहिरातीचे फलक लावणे महागात पडणार आहे.

राजकीय दबाव
राजकीयपक्षांच्या उमेदवारांचे प्रचार करणारे हे फलक काढताना काही ठिकाणी कर्मचाऱ्यांवर दबाव आला. निवडणुकीनंतर पाहून घेऊ, असे सूचित करण्यात आले, अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे.