आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय फाटाफुटीमुळे आता समीकरणे बदलली बाळापूर मतदारसंघातील निवडणूक बहुरंगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर- रणधुमाळीतसारेच जण हात धुऊन घेण्याच्या तयारीने मिळेल त्या पक्षाचे तिकीट घेऊन किंवा प्रसंगी अपक्ष अर्ज सादर करून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काल या पक्षात असलेला पदाधिकारी आज दुसऱ्या पक्षाच्या तंबूत दिसत आहे. पक्ष प्रवेशांना पेव फुटले आहेत. अशा या अभूतपूर्व गोंधळात बाळापूर मतदारसंघाचा भाग असलेल्या पातूर तालुक्यामध्ये स्थानिक उमेदवाराचा मुद्दा चर्चेला आला आहे. स्वातंत्र्यापासून पातूरकरांवर होणारा अन्याय धुऊन टाकण्याची भाषा बोलली जात आहे. अशा परिस्थितीत सारीच समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
पातूर तालुका हा पूर्वीपासून बाळापूर विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुकीत पातूर तालुक्याची भूमिका ही नेहमीच महत्त्वपूर्ण राहत आली आहे. मात्र, असे असताना उमेदवारीच्या बाबतीत मात्र पातूरकरांवर नेहमीच अन्याय झाला आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारी ठरवताना पातूरपेक्षा बाळापूरलाच जास्त महत्त्व दिलेले आहे. असे स्वातंत्र्य मिळाल्यापासून होत आल्याने निवडणूक आल्यानंतर स्थानिक उमेदवारीचा मुद्दा पातुरात नेहमीच चर्चेला येतो. या वेळेसही तो चर्चेला आला आहे. कारण राजकीय पक्षांनी पातूरकरांच्या इच्छेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. नेहमीच या तालुक्यावर बाहेरचा उमेदवार लादण्यात आल्याने अन्याय झाल्याची भावना येथे वाढीस लागली आहे. त्याचा काही परिणाम निवडणुकीत दिसतो का, हे आता दिसणार आहे.
दरम्यान, राजकीय पक्षांमधील फाटाफुटीमुळे अतिशय गोंधळाचे वातावरण सध्या पसरले आहे. अशा परिस्थितीत नेमका कोण विजयी होणार, हे आज रोजी कोणीही छातीठोक सांगू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. बाळापूर मतदारसंघात आजपर्यंत केवळ दुरंगी किंवा तिरंगीच लढती झाल्या आहेत. अशा लढतीमध्ये विजयी होणाऱ्या उमेदवारांचे मताधिक्य अगदीच कमी राहिल्याचे दिसून आले आहे. या वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीत अधिकृत सहा पक्षांचे तगडे उमेदवार तर आहेतच, शिवाय अपक्ष उमेदवारांचाही भरणा अधिक आहे. त्यामुळे निवडणूक ही पंचरंगी किंवा बहुरंगी होऊ शकते. अशा परिस्थितीत विजयाचा फरक हा फारच कमी राहणार आहे.
भाजप-शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडी संपुष्टात आल्याने राज्यातील विधानसभा निवडणुकांचे चित्रच बदलले आहे. या बदलामुळे बाळापूर मतदारसंघातील निवडणूक कधी नव्हे ती बहुरंगी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जनतेच्या समस्या सोडवणारा उमेदवार हवा
पातूरकरांच्यादृष्टीने या तालुक्याचे प्रश्न समस्या सोडवणारा उमेदवार निवडून येण्याची गरज आहे. प्रत्यक्ष प्रचाराच्या वेळी सर्वच उमेदवार असे आश्वासन देतात. मात्र, ती आश्वासने पूर्ण होतील अशी शाश्वती नसते. उमेदवारीच्या बाबतीत पातूरकरांवर जसा अन्याय झाला आहे, तसा विकासाच्या बाबतीतही झाला आहे. या तालुक्याचा कोणताही विकास झालेला नाही. उद्योग, शिक्षण, कला, सांस्कृतिक क्षेत्रात तालुका मागासलेलाच आहे.