आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-सेनायुती तुटल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- भाजप-सेनायुती तुटल्याने आता दोन्ही पक्षांना पाचही विधानसभा लढवाव्या लागणार आहेत, तर आघाडी तुटल्याचीही घोषणा झाली आहे. या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. जिल्ह्यात भारिप-बमसंचे बऱ्यापैकी अस्तित्व असल्याने होणाऱ्या पंचरंगी लढतीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चारही पक्षांनी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली असून शुक्रवारी काही उमेदवार अर्ज दाखल करू शकतात.
युती तुटण्यापूर्वी भाजपने अकोला पूर्ववर दावा केला होता. या जागेवर तीन निवडणुकीत शिवसेनेला पराजयाचा सामना करावा लागला. त्यामुळे ही जागा आम्हाला द्या, अशी मागणी भाजपने केली होती. परंतु आता या मागणीला अर्थ राहिलेला नाही, तर शिवसेनेलाही अकोला पश्चिम मतदारसंघ हवा होता. आता दोन्ही पक्षांना सर्व जागा लढविण्याची संधी मिळणार आहे. भाजपने अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ. रणजित पाटील, रणधीर सावरकर, डॉ.अशोक ओळंबे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर अकोला पश्चिममधून गुलाबराव गावंडे, राजेश मिश्रा, संग्राम गावंडे, मंजूषा शेळके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या अनेक इच्छुकांनी दावा केला होता. परंतु, तेजराव थोरात यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी सेवकराम ताथोड, सुभाष धनोकार हे इच्छुक आहेत. यापूर्वी सेवकराम ताथोड यांनी बंडखोरी केलेली आहे, तर अकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने महेश गणगणे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार संजय गावंडे, भाजपकडून स्मिता राजनकर, जया गावंडे, राजेश नागमते यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असून, विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना उमेदवारी मिळू शकते, तर शिवसेनेकडून महादेव गवळे, रणबावळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
आघाडीतबिघाडीमुळे हीच गत
भाजप-सेनायुती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्याने दोन्ही पक्ष पाचही मतदारसंघांत उमेदवार देणार आहे. आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ मर्तिजापूर मतदारसंघ देण्यात आला होता. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने अकोला पूर्व, अकोट आणि अकोला पश्चिमची मागणी केली होती. विशेष करून अकोला पूर्व आणि अकोला पश्चिमसाठी राष्ट्रवादी इच्छुक होती. या बदल्यात मूर्तिजापूर मतदारसंघ सोडण्याची तयारीही राष्ट्रवादीने केली होती. अकोला पूर्वमधून काँग्रेसचे दादाराव मते, डॉ. सुभाष कोरपे, पुरुषोत्तम दातकर इच्छुक होते. आता या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरीष धोत्रे यांना उमेदवारी तर अकोला पश्चिममधून काँग्रेसतर्फे विजय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजय तापडिया, सय्यद युसूफ अली, बाळापूर मतदारसंघात. खतीब यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्रीकांत पिसे, ओम सावल हे इच्छुक असताना प्रकाश तायडे हे राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक आहेत. अकोटमधून राजीव बोचे, रमेश हिंगणकर, प्रदीप वाघ, वसंतराव खोटरे, मूर्तिजापूरमधुन प्रतिभा अवचार, डॉ.सुधीर विल्हेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.