अकोला- विधानसभानिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पाच मतदारसंघातून एकूण ६६ उमेदवारांनी बॅक टू पॅव्हेलियन केले. त्यामुळे आता पाच मतदारसंघात एकूण ९३ उमेदवार रिंगणात आहेत. पाच प्रमुख पक्ष रिंगणात असले तरी काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत. तीन मतदारसंघात झालेल्या बंडखोरीचा फटका काँग्रेस, भाजपला बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर आता उमेदवारी कोण मागे घेणार? याबाबत मतदारांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागली होती.
आज, उमेदवारी मागे घेताना अकोला पूर्व मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. दशरथ भांडे, चंद्रमणी वाहुरवाघ, काँग्रेसचे पुरुषोत्तम दातकर यांच्यासह एकूण नऊ तर अकोला पश्चिममध्ये शिवसेनेचे राजेश मिश्रा, मुकीम अहमद, भारिप-बमसंचे किशोर मानवटकर आदींसह एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तर अकोटमधून १२, बाळापूर विधानसभा मतदारसंघातून २५, मूर्तिजापूर मतदारसंघातून ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.