आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचाराचे भोंगे थंडावले, आता सर्वत्र सुरू झाल्या गाठीभेटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विधानसभानिवडणुकीचा प्रचार संपला. परंतु, प्रचारादरम्यानही उमेदवारांनी, त्यांच्या पाठीराख्यांनी मतदारांशी पदयात्रेच्या माध्यमातून संपर्क साधला. त्याला आता अधिक जोर येईल. या वेळी प्रचाराला उणे-पुरे पंधरा दिवस राजकीय पक्षांना मिळाले. आपापल्या कुवतीप्रमाणे प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. मात्र, त्याचा प्रभाव फारसा दिसला नाही. वाहनांवरून गोंगाट करण्यापेक्षा उमेदवारांनी रॅली काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बुधवारी मतदान असल्याने दुसरा मार्गही शिल्लक नाही.
राजकीय पक्षांचा विचार केल्यास भाजपकडून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या जिल्ह्यात सभा झाल्या. काँग्रेस पक्षाकडून राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहिलोत, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी सभा घेतल्या. भारिपची धुरा पक्षाचे सर्वेसर्वा अॅड प्रकाश आंबेडकर यांनी वाहिली. आंबेडकरांचा शब्द परवलीचा असल्याने भारिपची तीच ताकत मानली जाते. भारिप उमेदवारांसाठी त्यांनी जोर लावला, तर राष्ट्रवादीकडून कोणी मोठा नेता प्रचाराला आला नाही. नाही म्हणता वाशीमकडे जाताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अकोल्याला काही वेळ थांबले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी सूचना दिल्या. काही नेत्यांशी बंदद्वार चर्चा करून ते निघून गेले. स्थानिक पदाधिका-यांवर राष्ट्रवादीच्या प्रचाराची भिस्त होती. मनसेचा या निवडणुकीत विशेष प्रभाव दिसला नाही. प्रचारासाठी पारंपरिक यंत्रणेसोबतच सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला. एसएमएस, व्‍हॉइस मेसेजेसद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. नेत्यांनीही मतदारांशी आधुनिक साधनांद्वारे संवाद साधला.
या वेळच्या प्रचारात नावीन्य असे नव्हते. नेहमीचाच बाज प्रचारासाठी वापरण्यात आला. तीच ती गाणी, नेहमीच्याच घोषणा, पोकळ आश्वासने यांचा फार काही उपयोग होतो, अशी स्थिती राहिलेली नाही. लोकांना मतांचे महत्त्व कळले आहे. मतदानाप्रति लोकही जागृत आहेत. प्रचार निवडणुकीचा भाग असला, तरी मतदारांना भुलवण्यात त्याचा उपयोग होतो, असे दिवस राहिले नाहीत. ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न सध्या उग्र असल्याने खरिपानंतर ती मंडळी रब्बीच्या पेरणीची तजवीज करण्यात सध्या व्यस्त आहे. येणारे वर्ष कसे जाईल, ही चिंता त्यांना असल्याने लोकशाहीच्या एवढ्या मोठ्या उत्सवात त्यांनी मत प्रदर्शित करण्याचे त्यांनी टाळल्याचे राजकीय पक्षातूनच सांगण्यात आले.