आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम कार्डची माहिती घेऊन केली खरेदी, तेरा हजार शंभर रुपयांची केली फसवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एटीएम कार्ड व्हेरीफिकेशन करायचे आहे, तुमचा एटीएम कोड बदलला आहे, अशी बतावणी करून तोतया स्टेट बँकेच्या मॅनेजरने एका महिलेच्या एटीएम कार्डची सखोल माहिती घेतली व त्या एटीएम कार्डमधून 13 हजार 100 रुपयांची खरेदी करून महिलेची फसवणूक केली. ही घटना 23 जुलै रोजी घडली. फसवणूक झालेल्या महिलेने 24 जुलै रोजी रात्री पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

रणपिसेनगरातील शिव अपार्टमेंटमध्ये भारती वासुदेव करांडे राहतात. त्या जी. एस. कॉन्व्हेंटमध्ये नोकरी करतात. त्यांना 23 जुलैच्या रात्री एक फोन आला. एटीएम मॅनेजर स्टेट बँक कुर्ला मुंबई येथून रोहित मल्होत्रा बोलतो म्हणून त्यांनी भारती करांडे यांच्याशी संवाद सुरू केला. तुमचा एटीएमचा कोड बदलल्याचे त्याने सांगून भारती करांडे यांना 19 आकडी नंबर विचारला. नंबर घेतल्यानंतर बँकेकडून जो मेसेज येईल तो मला सांगा, असे त्याने महिलेला सांगितले. मेसेज आल्यानंतर महिलेने तो मेसेज रोहित मल्होत्रा यांना सांगितला. त्यानंतर पाच मिनिटांनी एक नंबर त्याने महिलेला सांगितला आणि फोन ठेवला. मात्र, काही वेळाने महिलेला दोन, तीन मेसेज आले. ते मेसेस बघितले असता, भारती करांडे यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांच्या एटीएममधून 13 हजार 100 रुपयांची खरेदी झाल्याचे त्यांना समजले. त्यांनी 24 जुलै रोजी सकाळी स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेत विचारणा केली असता, त्यांना त्यांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढल्याचे
एटीएममधील गार्डने सांगितले.
याप्रकरणी त्यांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि ज्या नंबरहून त्यांना फोन आला होता, त्या मोबाइलधारक रोहित मल्होत्रा याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.