आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर; घातपात की आत्महत्येचा प्रयत्न?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उरळ / अकोला - नववर्षाच्या आगमनाचे स्वागत होत असताना पहिल्याच दिवशी एका कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली. विषबाधा की आत्महत्येचा प्रयत्न की अजून काही याबद्दल साशंकता असल्यामुळे नक्की कारण स्पष्ट होऊ शकले नाही. ही घटना गुरुवारी सकाळी ९.३० वाजता बाळापूर तालुक्यातील मोरझाडी येथे उजेडात आली.

गुरुवारी सकाळी अनिल बाबाराव मोरखडे (वय ५७) यांच्यासह त्यांची पत्नी रेखाबाई अनिल मोरखडे (वय ४५), मुलगा धीरज अनिल मोरखडे (वय २०), आधार अनिल मोरखडे (वय १८) आणि मुलगी प्रीती अनिल मोरखडे (वय १५) हे त्यांच्या शेतात विषबाधा झालेल्या अवस्थेत आढळून आले. आईने रोगर घेतले आहे, अशी माहिती धीरजने त्याचे चुलतकाका भाऊराव मोरखडे यांना दिली.
त्यांनी शेतात जाऊन बघितले, तर त्यांना पाचही जण पडलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी घटनेची माहिती उरळ पोलिसांना दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी रोगरच्या अर्ध्या लिटरच्या दोन बाटल्या आणि एका लिटरची तिसरी बाटली जप्त केली आहे.

कुटुंबातील गंभीर
- धीरज अनिल मोरखडे, वय २०
- रेखाबाई अनिल मोरखडे, वय ४५
- अनिल बाबाराव मोरखडे, वय ५७
- आधार अनिल मोरखडे, वय १८
- प्रीती अनिल मोरखडे, १५
कारणाचा शोध
त्या कुटुंबाचे गावातच भांडण आहे, त्यादिशेने घटनेचा तपास सुरू आहे. बयाण झाले नसल्यामुळे विषबाधेचे कारण सांगता येत नाही. मात्र, सर्व बाजूंनी तपास सुरू असून, नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल, असे बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे यांनी सांगितले.
घटनेला वादाची किनार
गावातीलच २३ वर्षीय घटस्फोटीत महिला कापूस वेचण्यासाठी तिच्या शेतात ११ नोव्हेंबर २०१४ रोजी गेली असता, तिच्याशी लगट करण्याचा धीरजने प्रयत्न केला होता. महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून त्याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्याला अटकही केली होती. जामिनावर आल्यानंतर त्याने तक्रार मागे घेण्यास दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. २९ डिसेंबर रोजी धीरज, त्याचे वडील यांनी महिलेच्या चुलतभावासोबत भांडण केल्याची तक्रार पोलिसात झाली होती. त्याच दिवशी पुन्हा धीरज त्याचा भाऊ आधार यांनी महिलेच्या मोठ्या वडिलांना मारहाण केली होती.