आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा युवकावर प्राणघातक हल्ला कत्ता, तलवार आणि लोखंडी रॉडचा वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - देशमुख फैल येथील युवराज फकिरा आपोतीकर या १९ वर्षीय युवकावर शिवाजी कॉलेजच्या बाजूला असलेल्या महाराष्ट्र बँकेसमोर सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला. हल्लेखोरांनी कत्ता, तलवार आणि लोखंडी रॉडचा वापर केला. त्यात युवक गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. देशमुखफैल आणि विजयनगरमधील वाद सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षभरापासून येथील दोन गटांत धुसफूस सुरू आहे. त्या वादाने सोमवारी गंभीर वळण घेतले. युवराज हा दुपारी त्याचा भाऊ संदीप याच्यासोबत मोबाइल रिचार्ज करण्यासाठी चालला होता. अचानक दुचाकीवरून आलेल्या काही युवकांनी त्यांना बँकेसमोर घेरले. युवराजवर हल्ला चढवला.
डोक्यावर आणि मानेवर वार करण्यात आले. युवराज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. रामदासपेठ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. युवराजला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी विजयनगर येथील कालू विरावंडे (२३), सूरज कलाने (२३), छोटू थामेत (२५), प्रेम उर्फ पिया खरे (२७), शुभम पाराचे (२४), तिलक सारवान (२४) आणि लखन डागोर यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.
आरोपींच्या अटकेसाठी महिला धडकल्या ठाण्यावर
आम्हाला येथील टवाळखोर युवकांचा मोठा त्रास आहे. मोटारसायकलीवरून धूम स्टाइल जाणे आणि येथील महिला आणि पुरुषांना त्रास देणे हे नित्याचेच झाले आहे. यापूर्वी अनेक वेळा येथील महिलांनी रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या लक्षात ही बाब आणून दिली आहे. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. आरोपींना शोधून काढून तत्काळ अटक करा, अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.

वर्षभरापासून वाद
वर्षभरापासून देशमुखफैल आणि विजयनगर येथील युवकांमधून विस्तव जात नाही. वर्षभरात परस्परविरोधी अनेक तक्रारी रामदासपेठ पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. त्या वादाला आठ दिवसांपूर्वी तोंड फुटले होते. त्यामध्ये परस्परांना मारहाण करून गुन्हेही दाखल झाले होते. त्याचीच परिणती सोमवारच्या हल्ल्यात झाली.
बुधवारचा वाद
दीड महिन्यांपूर्वी विशाल धन्नू सारवान यांनी त्यांच्या पानपट्टीवरून युवराजचा भाऊ सागर आपोतीकर आणि त्याच्या दोन मित्रांना उधार सिगारेट दिली नव्हती. तिघांनी बुधवारी सकाळी विशालला रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्यावर तो आणि त्याची आई काम करत असताना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा संबंधसुद्धा सोमवारच्या घटनेशी असल्याची माहिती ठाणेदार सुधाकर देशमुख यांनी दिली