आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोरिक्षा परवान्यासाठी चालकांची धावपळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- 19 वर्षांनंतर नवीन ऑटोरिक्षा परवाना देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ऑनलाइन पद्घतीने अर्ज मागवले आहेत. त्यासाठी रिक्षाचालकांची सध्या धावपळ सुरू आहे. अर्ज ऑनलाइन असले, तरी नेट बँकिंगसोबतच चलनाद्वारे शुल्क भरण्याची सोयही उपलब्ध आहे. जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयांतून सुमारे 350 परवाने देण्यात येणार आहेत. त्यासाठी महाऑनलाइन या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. सरकारची संग्राम केंद्र आणि सायबर कॅफेंमध्येही अर्ज भरून देण्याची सोय आहे. त्यासाठी शंभर रुपये शुल्क असून, ते इलेक्टॉनिक्स स्वरूपात आणि चलनाद्वारे भरण्याचीही सोय आहे. मात्र, या प्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती नसलेल्या रिक्षाचालकांची धावपळ सुरू आहे. काही ठिकाणी त्यांच्याकडून अर्ज भरून देण्यासाठी जादा शुल्क आकारले जात असल्याच्याही तक्रारी आहेत़
शासनाच्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांच्या कार्यक्षेत्रातील रिक्षा परवान्यांच्या वाटपासाठी इच्छुक व पात्रताधारकांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्घतीने 15 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ऑटोरिक्षा परवाना वितरणाची प्रक्रिया शासनाने बंद केली होती. परंतु, शासनाने ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे ऑटोरिक्षाचालकांना परवान्याची संधी उपलब्ध झाली आहे. परवानासाठी अर्जदारांनी केवळ ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जासाठी प्रक्रिया शुल्क 100 रुपये असून, ते विना परतावा आहेत. परिवहन कार्यालयामार्फत जारी केलेल्या बॅचधारक अर्जदारालाच अर्ज सादर करता येईल. परवान्यांवर चालणार्‍या ऑटोरिक्षा ही एलपीजी, सीएनजी किंवा पेट्रोलवर चालणारी असणे गरजेचे आह़े ऑटोला इलेक्ट्रॉनिक मीटर आवश्यक आहे. ऑटोरिक्षा नवीन किंवा 5 वर्षांपर्यत जुनी असलेल्या ऑटोचालकांनाच हे परवाने देण्यात येणार आहे.
अर्जदाराकडे वाहन, चालक अनुज्ञप्ती तसेच सार्वजनिक सेवा वाहनाचा बॅच असणे गरजेचे आहे. अर्जदारास मराठीचे व स्थानिक क्षेत्राचे ज्ञान आवश्यक आहे. लॉटरी सोडत 26 फेब्रुवारीला काढून निकाल 27 फेब्रुवारीला संकेतस्थळावर प्रसिद्घ केला जाणार आह़े अर्ज हे महाऑनलाइन संस्थेमार्फतच भरणे सक्तीचे आहे. अर्जदाराचे वय 20 वर्षांपेक्षा जास्त असावे, तो दहावी उत्तीर्ण असावा. पुरेशा संख्येत दहावी उत्तीर्ण ऑटोरिक्षा बॅचधारक अर्जदारांकडून अर्ज प्राप्त न झाल्यास आठवी उत्तीर्ण झालेल्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अर्जदार महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य करणारा असावा, त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. अर्जदारावर वास्तव्याच्या क्षेत्रात दखलपात्र गुन्हा नोंद नसावा, अर्जदार शासकीय व निमशासकीय नोकरीत नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे, ऑटोरिक्षा, टॅक्सीचा परवाना नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे, असेही नियम लागू आहेत. नियम, अटी व शर्तीमुळे इच्छुक ऑनलाइन अर्ज करण्यातून बाद झाले आहेत. काही वेळा सर्व्हर डाउन राहत असल्याने ऑनलाइन अर्ज भरण्यात अडथळा येत असल्याचीदेखील माहिती आहे.
ऑनलाइन प्रक्रिया
परवान्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. इच्छुकांनी नियमानुसार अर्ज ऑनलाइन सादर करावा. या प्रक्रियेनंतर लॉटरी पद्धतीने सोडत मुख्यालयातूनच होणार आहे.’’ विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
गैरप्रकारांना आळा
परवाना वाटप करण्यासाठी कॉम्प्युटराइज्ड पद्घतीनेच सोडत काढण्यात येणार असल्याने यामध्ये गैरप्रकार आणि वशिलेबाजीला वावच राहिला नाही. परवाना वाटप करताना पारदर्शकता राहणार आहे.