आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पीयूसी' विना धावताहेत शहरामधील ऑटोरिक्षा, वायू प्रदूषण वाढल्याने पर्यावरण संतुलन बिघडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरात धावणारे ऑटोरिक्षा, शहर आणि एसटी महामंडळाच्याही काही भंगार बसेसमुळे वातावरणात कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जित केला जात आहे. त्यामुळे वायू प्रदूषण होत आहे. पण, त्यांच्याकडे पीयूसी प्रमाणपत्र आहे की नाही, याचा तपास करणे गरजेचे झाले आहे. त्यांच्याकडे पीयूसी प्रमाणपत्र नसेल, तर त्यांची पीयूसी तपासणी कोण करणार, हाही प्रश्न या अनुषंगाने उपस्थित झाला आहे.

वाहनांकडून प्रदूषण होत नाही, असे प्रमाणपत्र वाहनधारकाने मान्यताप्राप्त पीयूसी सेंटर्सकडून तपासणी करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, असे प्रमाणपत्र घेतले नसताही शहरात अनेक वाहने राजरोसपणे चालत आहेत. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होत आहे. परिणामी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी वाहनाच्या पीयूसी प्रमाणपत्र तपासणी मोहीम राबवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
फुप्फुसाच्या आजाराला मिळतेय निमंत्रण
वाढत्या वायू प्रदूषणामुळे फुप्फुसाचे आजार बळावतात. त्याचा प्राण्यांसह पर्यावरणावर परिणाम होतो. परिणामी, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
रॉकेलच्या वापरानेही होत आहे प्रदूषण
काही वाहनधारक वाहनामध्ये पेट्रोल आणि डिझेलऐवजी रॉकेलचा वापर करतात. त्यामुळे प्रदूषण होत आहे. परिणामी, वाहनातील इंधनाचे नमुने घेऊन रॉकेलचा वापर करणाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे.