आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Autumn Season News In Marathi, Nature, Farmer, Divya Marathi

ऋतुराज वसंताचा अग्रदूत ‘कोकीळ’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - निसर्गाच्या लहरी स्वभावाचा फटका आपण अनुभवला. गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकरी बांधवांची झालेली दैनावस्था आपल्याला व्याकुळ करते. वसंताच्या आगमनाबरोबर आलेली ही आपत्तीच होय.
या ऋतुराज वसंताचा अग्रदूत जर कुणी असेल, तर तो आहे ‘कोकीळ’. या कोकीळ पक्ष्याविषयी पक्षीतज्ज्ञ दीपक जोशींनी ‘दिव्य मराठी’शी साधलेल्या संवादात रोचक माहिती दिली. वसंत ऋतूचे आगमन आणि पक्षी जगतातील घडामोडींवर त्यानिमित्ताने त्यांनी प्रकाश टाकला आहे.


मार्च महिना म्हणजे वसंतऋतूचा प्रारंभीचा काळ. वसंतऋतू हा सर्व ऋतूंचा राजा. ऋतुराजाच्या प्रारंभी निसर्ग वसंताची प्रसादचिन्हे धारण करू लागला आहे. नेहमीप्रमाणे बुलबुलांचे जोडपे घरट्याच्या तयारीला लागले आहे. तुमच्या आमच्या घरासमोरच तारेवर, वृक्षांवर, अंगणात दयाळ पक्षी हजेरी लावतो, त्याचे नर्तन प्रेक्षणीय आणि गायन श्रवणीय असते. घरासमोर एखादे गुलमोहराचे छोटेखानी झाड असेल तर तांबटाचा संसार बारकाईने लक्ष ठेवल्यास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. तांबटाचा पुक् पुक् असा आवाज आसमंतात घुमायला लागला आहे. दीपक जोशी म्हणाले की, ही सर्व मंडळी आणि यांच्याबरोबर श्री. व सौ. कोकीळ आपल्याला शहरात दिसणारी, आपल्या रंग, रूप आणि आवाजाने रिझवणारी आहे. अशा या द्विजगणांमध्ये कोकीळ पक्ष्याला वसंताचा अग्रदूत म्हटले जाते, कारण आंब्याला मोहर फुटला की, कोकिळेला स्वरगुंजनासाठी नेमका याच वेळी कंठ फुटतो. त्याच्या कुहू कुहू तानांबरोबर आपण क्षणभर आम्रतरूंच्या राईत गर्द सावलीत तरंगत जातो. लहान मुले तर त्याला वेडावून दाखवण्याकरिता त्याच्या पाठोपाठ त्याची नक्कल करत राहतात. कोकीळ त्यांना उलट साद देतो. कुहू कुहू कुहू कुहू असा गोड स्वर म्हणजे जादूने भारलेले शब्दच. इतरांना अशा ताना मारता येणार नाहीत, ‘कोयलकी गत कोयल जाने’ असे म्हणावे लागेल. अनेक कवींचा हा काव्य विषय ठरला आहे.


असा हा कोकीळ आपल्याकडे दिसतो. सध्या त्याच्या गुंजनाने आपले लक्ष वेधून घेतो आहे. नर कोकीळ गातो हा काळ्या चकचकीत रंगाचा, तर मादी भुरकट तांबूस रंगाची. तिच्या शरीरभर जाई जुईची फुले फुललेली असावीत असे पांढर्‍याशुभ्र रंगाचे ठिपके दिसतात. दोघांचा फळांवरच जीव असतो, अधून मधून किड्यांची डिशही हे मटकावतात. अशा या निसर्गदूताला आपण न्याहाळायला हवे. आपल्या गुंजनाने निसर्गाची भूल पाडणारा हा पक्षी चपळतेने एका झाडावरून दुसर्‍या झाडाकडे उडताना आपली दृष्टी खिळवून टाकतो, असेही ते म्हणाले. आपल्या आसपास दिसणार्‍या या द्विजगणाचे बारकाईने निरीक्षण करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.