आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्याचे बाबू बागडे यांची कला ओलांडणार भारताच्या सीमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - कुठल्याही प्रकारचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता केवळ आवड म्हणून परिसरातील गणेश मंडळातून सुरू केलेले देखावानिर्मिती व सजावटीच्या कामाने आज मुरलीधर उर्फ बाबू बागडे यांनाच नव्हे, तर 15 ते 16 कारागिरांच्या हाताला काम दिले आहे. एवढेच नव्हे, तर सौदी अरेबियातील मस्कत या शहरात भारतीय नागरिकांच्या वतीने आयोजित नवदुर्गा उत्सवाच्या सजावटीसाठी ते लवकरच रवाना होत आहेत.

बाबू बागडे हे नाव आता कलाक्षेत्राला परिचित आहे. रिगल चित्रपटगृहाजवळील क्रांती तरुण मंडळाच्या गणेशोत्सवातील सजावटीपासून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. त्या ठिकाणी काचेचा गणपती, नारळ, रुद्राक्ष, कलदार (एक रुपयांचे नाणे) यांची गणपती मूर्ती त्यांनी साकारली आहे. त्याला अकोलेकरांची दाद मिळाली. त्यानंतर अलिबाबाची गुहा, अजिंठा लेणी हे देखावे साकारले. अमरावतीमध्येही थर्मोकोल डेकोरेशनची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. त्यांनी अमरावतीत थर्मोकोलने साकारलेला आगर्‍याचा ताजमहल गणेशोत्सवानंतरही अमरावतीकरांच्या मागणीमुळे आठवडाभर पाहण्यासाठी तसाच ठेवण्यात आला होता. त्यानंतर मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, तिरुपती बालाजी, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, अहमदाबादचे अक्षरधाम, कोणार्कचे सूर्यमंदिर, दगडूसेठ हलवाई गणेश मंदिराची प्रतिकृती त्यांनी साकारली. एवढेच नव्हे, तर तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या अमरावती येथील नागरी सत्काराच्या स्टेज डेकोरेशनची धुरा त्यांनीच सांभाळली होती. राष्ट्रपती भवनात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताईंकडून त्यांचा या क्षेत्रातील योगदानासाठी सत्कार झाला होता. अकोल्यात मारवाडी प्रेस व टीव्हीएस गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याचे काम तेच पाहतात. तसेच बुलडाणा अर्बन गणेशोत्सव मंडळाची सजावट त्यांच्याकडे आहे.


मस्कतच्या नवदुर्गा उत्सवात सजावट
बाबू बागडे हे सौदी अरेबियातील मस्कत शहरात भारतीय समाजबांधवांच्या वतीने आयोजित नवदुर्गा उत्सवाच्या सजावटीचे काम करणार आहेत. त्यासाठी येत्या 13 सप्टेंबरला ते प्राथमिक पाहणीसाठी मस्कतला रवाना होत असून, नागपूरच्या इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुपकडून त्यांना ही संधी मिळाली आहे.


सजावट साहित्यात बदल
पूर्वी दूरध्वनी कार्यालयात पॅकिंग म्हणून वापरण्यात येणार्‍या थर्मोकोलचा वापर मी सजावटीत करीत होतो. मात्र आज थर्मोकोल शीटसह अनेक प्रकारचे सजावट साहित्य, मशिनरी बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे सजावटीचे काम सोपे झाले असून, मागणीही वाढली आहे. केवळ गणेशोत्सव, नवदुर्गा उत्सवापुरती सजावट र्मयादित न राहता मोठे सोहळे, लग्न, वाढदिवस आदी समारंभातही सजावट होते.