आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाळ दगावले तरी उपचारात दिरंगाई, स्त्री रुग्णालयात जीवाशी खेळ सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गर्भवतीच्या पोटातील बाळ दगावले असल्याचे माहीत असतानाही परिचारिकांनी त्या महिलेला जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागात भरती करून घेतले नाही. त्यामुळे गर्भवती महिलेस वेदना सोसाव्या लागून वेळेवर शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. जिल्हा स्त्री रुग्णालयातील पॅरामेडिकल स्टाफकडून असे जीवघेणे प्रकार नित्याचेच झाले आहेत. बुधवारी दुपारी ४.३० वाजता हा प्रकार उघडकीस आला.
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील भाग्यश्री अविनाश महल्ले (वय २२) ही महिला आपल्या पतीसोबत मंगळवारी सकाळी पोटात दुखत असल्याने पत्रकार कॉलनीतील डॉ. हर्षवर्धन मालोकार यांच्याकडे उपचारासाठी गेली. त्या ठिकाणी डॉ. मालोकार यांनी तिला सोनोग्राफी करण्याचे सांगितले. डॉ. गोविंद पाडिया यांनी सोनोग्राफी केली असता पोटातील भ्रूण २१ आठवड्यांचे असून, ते मृत असलेले त्यांच्या निदर्शनास आले. रिपोर्ट पाहिल्यावर डॉ. मालोकार यांनी त्या महिलेला शस्त्रक्रियेद्वारे बाळ काढावे लागेल, असे सांगितले. मात्र, पैसे नसल्याने आम्ही उद्या येतो, असे म्हणून अविनाश महल्ले पत्नीला घेऊन घरी परतले. मात्र, बुधवारी सकाळी पोटात जास्तच दुखत असल्याने गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना दाखवले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी बाळाच्या हालचाली मंदावल्या असल्याचे सांगत ताबडतोब अकोला येथे स्त्री रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. रुग्णवाहिकेने स्त्री रुग्णालयात सकाळी ११.३० वाजता महल्ले दाम्पत्य पोहोचले. मात्र, गर्दी असल्याने त्यांचा नंबर दुपारी वाजता लागला. डॉ. राधा जोगी यांनी भाग्यश्री महल्ले यांच्या केस पेपरवर भरती करून घेण्यात यावे, असा रिमार्कही दिला.
मात्र, ते ४.३० वाजेपर्यंत या महिलेला कुणीही विचारले नाही. तिचा पती अविनाश कितीदा परिचारिकेला सांगायला गेला. मात्र, तुम्ही एकटेच पेशंट नाहीत, जरा थांबा, असे म्हणून तिच्या पतीची अवहेलना केली. दरम्यान, हा प्रकार प्रसिद्धीमाध्यमांच्या कानावर पडला. पत्रकारांनी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांना या प्रकाराबाबत सांगितले असता त्यांनी डॉक्टर परिचारिकांना पाठवले. तेव्हा त्या महिलेची तपासणी डॉ. वनश्री डोईफोडे यांनी केली. तब्बल या सर्व प्रक्रियेला पाच तास अवधी गेला. या परिस्थितीत ती महिला वेदना सहन करत होती. मात्र, एकही कर्मचारी तिच्या मदतीला धावून आला नाही.
"त्या' कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस : मंगळवार,२६ मे रोजी एकाच रुग्णाचे दोन वेगवेगळे रक्तगट दाखवून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी अगडते यांना बुधवारी कारणे दाखवा नोटीस बजावली.
...तर दवाखान्यास टाळे लावलेले बरे
- गंभीर असलेल्या रुग्णावर जर रुग्णालयीन प्रशासन अशा प्रकारे उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असेल, तर सरकारी दवाखान्यांना टाळे लागलेलेच बरे. रोजच रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे.''
अविनाश महल्ले, रुग्ण महिलेचा पती.
काय म्हणाले डॉक्टर

बुधवारी रुग्णांची गर्दी बरीच असते. त्यामुळेच कदाचित विलंब झाला असेल.
डॉ.आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका.
तुम्ही काळजी करू नका. डॉ. डोईफोडे मॅडम पेशंटच पाहत आहेत. भाग्यश्रीला काहीही होणार नाही.
डॉ. विनोद जाधव, वैद्यकीय अधिकारी.
आम्ही आता आलो आहे. आज रुग्ण खूप आहेत. थोडा उशीर झाला आहेच.
डॉ. एस.पी. जोशी, बीटीओ.
बातम्या आणखी आहेत...