आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bad Work Of Neckles Road , Its Need To Quality Control

नेकलेसरोडचे काम निकृष्ट, गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून तपासणीची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - नेकलेसरोडवरील नेहरूपार्क चौक ते सिव्हिल लाइन चौक, रतनलाल प्लॉट ते दुर्गा चौक आणि पुढे स्टेट बँकेची रामदासपेठ शाखा या मार्गावरील अर्धवट व निकृष्ट कामामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. या रस्त्यावर होत असलेले काम निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून रस्त्यांची तपासणी करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.


सुमारे 67 लाख रुपयांचा नेकलेसरोड तयार करण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली. सुरुवातीला या रस्त्याची रुंदी साडेसात मीटर होती, नंतर ती दहा मीटर करण्यात आली. त्यामुळे या रस्त्याची लांबी घटली. रामदासपेठ स्टेट बँकेपासून सुरू झालेल्या या रस्त्याचे कुठेही सलग काम दिसून येत नाही, तर या रस्त्याच्या निर्मितीनंतर त्या बाजूला असलेल्या रस्त्यावर मुरूम टाकण्याची गरज होती, पण तसे झाले नाही. सध्या सुरू असलेल्या कामात पकड मिळवण्यासाठी टाकण्यात येणारे डांबर हे अत्यंत कमी स्वरूपात टाकण्यात येत आहे. त्यामुळे गिट्टीची पकड मजबूत होताना दिसत नाही. केवळ वरवर हे काम सुरू असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावरून वाहनचालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागते. रस्त्यावरचे काम अर्धवट असून, ते आता सिव्हिल लाइन चौकापर्यंत करण्यात येणार नाही. माथने संकुलापासून हा रस्ता आता 26 कोटींच्या प्रस्तावित कामात होणार आहे. त्यामुळे तो मंजूर होईपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता धुसर झाली. याविषयी मनपा अभियंता राजेश र्शीवास्तव यांना विचारणा केली असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

रस्ता अर्धवट नको पूर्ण करा
या रस्त्यावर असलेल्या दुकानदारांकडून जमा होणार्‍या टॅक्समधून हा रस्ता पूर्ण होऊ शकतो. या रस्त्याचे होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असून, त्याची चौकशी करण्यात यावी. नियमानुसार या रस्त्याची रुंदी व लांबीनुसारच काम होणे गरजेचे आहे. या रस्त्यावर देखरेख करणारे अभियंता राजेश र्शीवास्तव, अनिल गावंडे आदींची भेट नियमितपणे होत नाही. या रस्त्याची गुणवत्ता अधिकार्‍यांनी तपासावी. हा रस्ता चांगल्या प्रकारे केला गेला नाही, तर या रस्त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. अजय शर्मा, नगरसेवक भाजप.


रस्त्यावर डांबराचा वापर कमी
सध्या नेकलेस रोडवर सुरु असलेल्या कामात पकड मिळवण्यासाठी टाकण्यात येणारे डांबर हे अत्यंत कमी स्वरूपात टाकण्यात येत आहे. त्यामुळे गिट्टीची पकड मजबूत होताना दिसत नाही. त्यामुळे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्यात या रस्त्याने प्रवास करणार्‍या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावर शाळा व महाविद्यालये असल्यामुळे या रस्त्याने विद्यार्थ्यांची रोज ये-जा होते, पण हा रस्ता सर्वांसाठी अडचणीचा ठरत आहे.


रस्त्याची रुंदी वाढली, लांबी घटली
नेकलेस रस्त्याचे काम सुरू झाले, तेव्हा या रस्त्याची रुंदी साडेसात मीटर इतकी होती. त्यानंतर ती दहा मीटर करण्यात आली. काही ठिकाणचे इलेक्ट्रिक पोल अद्याप न हटवल्याने ती रुंदी तितकीच कायम आहे. पण, रुंदी वाढवल्याने लांबी घटली. नेहरूपार्क ते सिव्हिल लाइन चौक 485 मीटर, सिव्हिल लाइन ते दुर्गा चौक 900 मीटर, दुर्गा चौक ते रामदासपेठ स्टेट बँक शाखेपर्यंत 600 मीटर लांबीचा हा रस्ता आहे. पण, या संपूर्ण रस्त्यावर अर्धवट काम सुरू असून, ते लोकांसाठी मोठे डोकेदुखीचे ठरत आहे.