आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balapur Assembly Constituency,latest News In Divya Marathi

संदीप पाटील भाजपचे अधिकृत उमेदवार नाहीत, तिवारी यांची पत्रकार परिषदेत माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बाळापूर विधानसभा मतदारसंघात भाजपने तेजराव थोरात यांना उमेदवारी दिली असून, अपक्ष उमेदवार संदीप पाटील आपणच अधिकृत उमेदवार असल्याचे भासवत आहेत. पाटील अधिकृत उमेदवार नाहीत तसेच निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेत्यांचे फोटो प्रचार साहित्य, जाहिरातींवर छापून ते दिशाभूल करत असल्याने त्यांच्यािवरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय लीगल सेलचे सहसंयोजक अॅड. विनोद तिवारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
थोरात यांच्या वतीने अंबादास उमाळे यांनी पाटील यांच्याविरुद्ध मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे, जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण शिंदे यांच्यासमक्ष तक्रार दाखल केली आहे. जनप्रतिनिधी कायद्यानुसार तो गुन्हा अाहे. आठ ऑक्टोबर रोजी आपण जिल्हाधिका-यांची भेट घेऊन याविषयी याचिका सादर केली.
अपक्ष उमेदवार पाटील यांची कृती भादंविचे कलम 420,171 एचनुसार गुन्हा ठरत असल्याने पाटील करत असलेल्या उचापती त्यांनी थांबवाव्या. भाजपविरोधी शक्तींचा हा डाव असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. खामगावच्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी तेजराव थोरात यांच्या पाठीशी भाजप उभी असून, त्यांचा उल्लेख सर्वप्रथम केला, ही आठवण अॅड. तिवारी यांनी करून दिली. तसेच सध्या बाळापूरमध्ये सुरू असलेल्या घडामोडींची माहिती नितीन गडकरी, विनोद तावडे या नेत्यांनाही देण्यात आली आहे.
शिवसंग्रामचा बाळापूरच्या जागेसाठी आग्रह होता. परंतु, तेजराव थोरात यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आल्यानंतर प्रश्न मिटला, असेही तिवारी यांनी सांगितले. पाटील यांच्याकडून सुरू असलेल्या गैरकृतीबाबत प्रशासनाकडे चार ऑक्टोबरला तक्रार देऊनही पाटील यांच्याविरुद्ध प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यांना पाठीशी घालण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. दोन दिवसांत पोस्टरवरून मोदी आणि भाजप नेत्यांची छायाचित्रे पाटील यांनी हटवली नाहीत, तर भाजप लोकशाही मार्गाने ती काढेल, असा इशाराही देण्यात आला. भाजप उमेदवाराविरुद्ध होत असलेला गैरप्रकार थांबावा, हा आमचा उद्देश असल्याचे तिवारी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला, सुभाषसिंग ठाकूर, विजय अग्रवाल उपस्थित होते.