आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balapur Assembly Constituency,latest News In Divya Marathi

निवडणुकीला उरले केवळ सात दिवस;बाळापूरमध्ये होणार बहुरंगी लढत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळापूर- बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षाचे प्रमुख उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला असून, डोअर टू डोअर प्रचारावर सर्वच उमेदवारांची भिस्त दिसून येत आहे, तर उमेदवारांचे गावागावातील कार्यकर्ते आता सक्रिय झाले आहेत. असे असले तरी काही पक्षांतील उमेदवारांसोबतचे संबंध हे पक्षापलीकडले असल्यामुळे मतदार संभ्रमात पडले आहेत.
बाळापूर मतदारसंघाची निवडणूक जेवढी पक्षावर होते, तेवढीच निवडणूक उमेदवाराच्या जातीवर होत आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात जातीचा फॅक्टर महत्त्वाचा ठरत आला आहे. या वेळी प्रत्येक पक्षाचे उमेदवार उभे असल्यामुळे कधी नव्हे एवढे बहुरंगी चित्र या वेळेस अनुभवास येत आहे. त्यामुुळेच उमेदवारांच्या फुटलेल्या पोळ्यात मतदार संभ्रमात आहे. सध्या प्रचाराने जोर धरला असला तरी कुठलाच पक्ष प्रबळ भूमिकेत दिसून येत नाही. जेवढी उत्सुकता युती आणि आघाडी तुटण्याच्या काळात मतदारांमध्ये होती, तेवढी उत्सुकता आता मतदारांमध्ये दिसून येत नाही. आघाडीने आणि युतीच्या जागावाटपाच्या सौद्यामुळे मतदारांमध्ये त्या पक्षाच्या उमेदवाराबाबत कमालीची नाराजी आहे. सर्वच उमेदवारांकडून आपली बाजू मजबूत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी मतदारांच्या संभ्रमावस्थेमुळे उमेदवारसुद्धा विचारात पडले असून, आपआपली बाजू पटवून देण्यासाठी उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळेच उमेदवारांनी प्रत्येक गावात जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर जोर आहे. भारिप-बमसं, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसंग्राम यांनी प्रचारात आघाडी घेतली असली, तरी सध्या कोणत्याही पक्षाची जमेची बाजू दिसून येत नाही.