आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम : ऑल टाइम असुरक्षित; व्हॅनची सुरक्षा वार्‍यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरात ‘कॅश’ची धोकादायक वाहतूक होत आहे. कॅश व्हॅनची सुरक्षा वार्‍यावर असून, बँक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. कॅश व्हॅनच्या नियमांना तिलांजली देत, नियबाह्य वाहनांमधून कॅशची वाहतूक होत असल्याचा प्रकार शहरात सुरू असल्याचे बुधवारी समोर आले आहे.
शहरामध्ये सर्व प्रकारची बाजारपेठ विस्तारत आहे. परिणामी, शहरात दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. वाढती बाजारपेठ लक्षात घेता शहरात राष्टीयीकृत बँकेचे जाळे विणले जात आहे. स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, युनियन बँक आदी राष्ट्रीयीकृत बँकांसह आयसीआयसीआय, एचडीएफसी, एक्सेस, आयडीबीआय या कॉर्पोरेट बँकांनीही आपल्या शाखा अकोला शहरात उघडल्या आहेत.

गोरक्षणरोड, जठारपेठ, जवाहरनगरसह टिळकरोड, अकोटरोड, जुने शहरातील चित्र; असुरक्षित वातावरणात ग्राहकांचा व्यवहार
दुसरीकडे ‘एटीएम’च्या सुरक्षेबाबत सुरुवातीला काळजी घेतली. मात्र, ‘दिव्य मराठी’च्या चमूने बुधवारी शहरातील गोरक्षणरोड, जठारपेठ, जवाहरनगर, टिळक रोड, अकोटरोड, जुने शहर आदी परिसरातील 7 एटीएमला भेटी दिल्या. या पाहणीत ‘एटीएम’मधून पैसे काढताना ग्राहकांच्या सुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेतली नसल्याचे दिसून आले. कुणीही या, दरवाजा ढकला आणि आतमध्ये जा, शटर लावून घ्या, अशा पद्धतीने असुरक्षित वातावरणात ग्राहकांना एटीएम हाताळावे लागत असल्याचे पाहावयास मिळाले.
असे हवे सुरक्षित दार
‘एटीएम’चे दार उघडण्यासाठी सुरक्षेबाबतची खबरदारी घेणे आवश्यक असते. या दाराजवळ क्रेडिट-डेबिट कार्ड स्वॅप करण्यासाठी एक छोटी खाच असते. त्यात कार्ड स्वॅप केल्यानंतरच दार उघडणे अपेक्षित असते. ग्राहक एटीएम सेंटरमध्ये गेल्यानंतर दार अँटोमॅटिक लॉक व्हायला हवे. ‘एटीएम’ हाताळल्यानंतर बाहेर पडण्यासाठी दाराजवळ एक बटन असते. ते बटन दाबल्यानंतरच दार उघडते, तोपर्यंत बाहेरील व्यक्ती आतमध्ये येऊ शकत नाही.
कळस असुरक्षिततेचा
‘दिव्य मराठी’च्या चमूने शहरात विविध भागांत केलेल्या पाहणीत ‘सात एटीएम’मधून पैसे काढण्याची प्रक्रिया असुरक्षित असल्याचे आढळले. या वेळी कार्ड स्वॅप करून दार उघडण्याच्या यंत्रणा कुचकामी असल्याचे पाहावयास मिळाले. बहुतांश बँकांच्या एटीएममध्ये मॅग्नेटिक डोअर सिस्टिम नादुरुस्त आढळून आली.
काय घडले होते बंगळुरूमध्ये
कार्पोरेशन बँकेतील ज्योती उदय यांच्यावर बंदूक व कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.
सुरक्षेबाबत कळवले
बँकांना एटीएम सेंटरवर सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याचे कळवले आहे. यासंदर्भात बँक अधिकार्‍यांची बैठकही घेतली होती.
- अमरसिंह जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी.

या हव्यात सुधारणा
गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी इंडियन बँक असोसिएशन, रिझर्व्ह बँक आणि पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेऊन सुधारणा सुचवण्यात आल्या.
0 एटीएमवर 24 तास सुरक्षा व्यवस्था ठेवणे
0 बाहेर सीसीटीव्ही, घंटा बसवणे
0 आत उजेडाची व्यवस्था करावी
0 जाहिराती नको, आतील दृश्य दिसावे.
0 त्रयस्थ शटर बंद करणार नाहीत, अशी कुलूपे हवीत.

एटीएममधून पैसे काढताना सुरक्षेची खबरदारी घेण्यात येत नसल्याचे वास्तव ‘दिव्य मराठी’च्या चमूने 4 डिसेंबरला केलेल्या पाहणीतून समोर आले. एटीएमचा वापर करणार्‍यांसाठी बॅँकांनी सुरक्षेचे पुरेसे उपाय केले नाहीत, तर ती यंत्रे बंद करावी लागतील, असा इशारा गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी एका बैठकीत दिला. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील निवडक एटीएमच्या सुरक्षेबाबत केलेल्या पाहणीत ग्राहकांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचे उजेडात आले.

नियमानुसार कॅश व्हॅन
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तीन कॅश व्हॅन आहेत. त्यावर आऊटसोर्सिंगमधून सुरक्षा रक्षक नियुक्त केले आहेत. कॅश व्हॅनच्या बाबतीत सुरक्षितता ठेवण्यात येते.
-केशव ठक्कार, झोनल मॅनेजर, महाराष्ट्र बॅंक.