आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bank Robber Contested Election On Shivsena Ticket

बँकफोड्या सुरेशने लढवली होती शिवसेनेकडून निवडणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- पुणे पोलिसांच्या हाती लागलेला अट्टल बँकफोड्या सुरेश उमकने अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात राजूरवाडी सर्कलमधून 2002 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती; परंतु तो पराभूत झाला होता. शिवसेनेचा उमेदवार म्हणून तो रिंगणात होता. त्या वेळी त्याच्यावर कोणताही गुन्हा नव्हता.

हा बँकफोड्या चेहर्‍यावर प्लॅस्टिक सर्जरी करून कित्येक दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. त्याने औरंगाबादेतही देवळाई भागात रो-हाऊस घेतले होते. काही काळ तो इथे होता. मात्र, पोलिसांची कुणकुण लागताच त्याने पोबारा केला. पुणे पोलिसांनी अलीकडेच त्याला नागपूरमध्ये अटक केली.

अमरावती जिल्ह्यातील विविध बॅँकांत दरोड्याप्रकरणी सुरेशवर 6 गुन्हे दाखल असून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येदेखील त्याने बँकफोड्या केल्या आहेत. मोर्शी तालुक्यातील कमळापूर गावचा रहिवासी असलेला सुरेश काशीराम उमक याच्यावर राज्यभर गुन्हे दाखल आहेत. 15 वर्षांपासून त्याचे बँकचोर्‍यांचे सत्र सुरू आहे. अमरावतीत ग्रामीण पोलिसांनी त्याला 20 सप्टेंबर 2004 रोजी सर्वप्रथम अटक केली. मोर्शी, शिरखेड, तिवसा या ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी विशाल मनोहर बारब्दे, रणजित मधुकर गांवडे यांनाही तेव्हा अटक केली होती. गेल्या पंधरा वर्षापासून सुरेश उमक सहकार्‍यांच्या मदतीने गुन्हे करीत आहे.

बँकफोड्याचे कारनामे
मंचर, कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपूरी, नाशिकमधील सिन्नर, पुणे जिल्ह्यातील येरवडा, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील जिल्हा सहकारी बँक, मध्यप्रदेशातील शिवणी येथील युनायटेड इंडीआ इंश्युरंस कंपनी कार्यालयात तसेच कॅनरा बँकेत चोरीचा प्रयत्न केला होता.

छिंदवाडामधील चौराही येथील ग्रामिण क्षेत्रीय बँकेत 2004 मध्ये 2 लाख 37 हजाराची चोरी केली होती. छत्तीसगड राज्यातील तुमगाव येथील एका बँकेत 4 लाख 6 हजाराची रक्कम त्याने लंपास केली होती.

अनेक ठिकाणी मारला हात
सुरेश उमकने अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँक, पिंपळखूटा येथील सेंट्रल बँकेत दरोडा घातला होता. सहकार्‍यांसोबत नाशिकमधील सिन्नर, पुण्यातील येरवडा, चंद्रपूरातील चिमूर, मध्यप्रदेशातील शिवणी, छिंदवाडा येथील ग्रामीण क्षेत्रीय बँक आणि छत्तीसगडमधील तुमगांव येथे देखील त्याने बँकेवर दरोडे घातले आहेत.

गॅस कटरचा वापर
गॅस कटरच्या सहाय्याने बँकेत चोरी करणे हा सुरेश उमकच्या डाव्या हाताचा खेळ होता. काही दिवसांपूर्वी तर त्यानेओळख लपविण्यासाठी थेट चेहर्‍यावर प्लास्टीक सर्जरी करवून घेतली. तसेच स्वत.चे नावसुध्दा बदलविले आहे. औरंगाबादला तो ओम उर्फ सागर रावसाहेब देशमुख या नाव्याने वास्तव्य करीत होता. अशी माहिती अमरावती ग्रामिण पोलिसांनी दिली.

अमरावती पोलिस पुण्याला जाणार
सुरेशच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी अमरावती ग्रामीण पोलिसांची मदत घेतली होती. त्यामुळे अमरावतीचे पथक त्यांच्यासोबत होते. अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आता पुण्याला जाणार आहे. त्यानंतर सुरेशला ताब्यात घ्यायचे किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल.
- अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक, अमरावती.