आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान, पाणी घेता की आजार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरात जारच्या पाण्याचे ३२ प्लांट आहेत. पण, पाणी शुद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा केवळ तिघांकडेच असल्याची नोंद अन्न औषध प्रशासन कार्यालयाकडे आहे. परिणामी, उन्हाळा सुरू झाला तसा शुद्धतेच्या नावाखाली अशुद्ध पाण्याचा व्यापार ‘तापला’ आहे. असे असताना कारवाईबाबत प्रशासन थंडच आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अनेक आजाराला अशुद्ध पाणीच कारण आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर अनेक जण कार्यालय, समारंभ या ठिकाणी खुले पाणी प्यायला धजावत नाहीत. परिणामी, हल्ली बहुतांश ठिकाणी जारचे पाणी मागवले जाते. त्यातून शहरात रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र, हे जारचे पाणी किती शुद्ध आणि किती अशुद्ध आहे, याची तपासणी करणारी कुठलीच यंत्रणा नाही. त्यामुळे केवळ पाणी पुरवणारी कंपनी सांगते म्हणून पाणी शुद्ध आहे, असे मानले जाते.
प्रत्यक्षात मात्र शहरातील २९ प्लांटधारकांकडे पाणी शुद्धता तपासणी करणारी प्रयोगशाळाच नाही. शहरात केवळ तीनच प्लांटधारकांकडे अशा प्रकारची यंत्रणा आहे. असे असताना त्यांच्याकडून सर्रास पाण्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

परवानगीचीप्रक्रिया अशी
कुठलाही प्लांट सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस) प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यानंतरच अन्न औषध प्रशासन विभागाकडून परवाना दिला जातो. उत्पादित प्रत्येक पाऊच, बॉटल किंवा जार यावर विशिष्ट युनिट क्रमांक, बॅच क्रमांक छापणे आवश्यक आहे. मात्र, घरोघरी पोहोचवल्या जाणा-या कॅनवर केवळ प्लांटचा संपर्क क्रमांक दिलेला असतो. ग्राहकही या बाबी तपासून पाहत नाहीत.

गुणवत्तेची माहिती नाहीच
पाण्याच्या गुणवत्तेची कोणतीही माहिती जारवर नसते. त्यामुळे घराबाहेर दिवसभर पिण्यासाठी वापरल्या जाणा-या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी आता पिणा-यांची आहे. अन्यथा हेच पाणी किडनीच्या दुर्धर विकारांना कारण होऊ शकते.
पिण्यासाठी नव्हे तर वापरासाठी
बाटलीबंद मिनरल वॉटरसाठी कायदेशीर स्टॅँडर्ड आहेत. तसेच, ‘आरो’ वॉटरसाठीही आहेत. परंतु, खुल्या पाण्यासाठी कायद्यात स्टॅँडर्ड नाहीत. याचाच फायदा वॉटर जार वितरक घेत आहेत. अन्न औषध प्रशासनाने जर कधी त्याची गुणवत्ता तपासली तर आम्ही हे पाणी पिण्यासाठी नाही तर वापरासाठी विकत आहोत, असाही खुलासा त्यांच्याकडून दिला जातो.

जडतात जीवघेणे आजार
अशुद्धपाण्याने विद्राव्य क्षार थाॅयरॉइड्‌स, मुतखडा, किडनीचे विकार, कॉलरा, डीहायड्रेशन, कावीळ, अतिसार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची शुद्धता तपासून पाहण्याची गरज आहे. केवळ पाणी थंड आहे म्हणून विकतचे पाणी घेऊ नये.'' डॉ.प्रफुल्ल वानखडे, होमिओपॅथी तज्ज्ञ.