आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तडजोडीचा खरा अर्थ समजला - ऊर्जा शाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- समाजात वावरताना वेळोवेळी अनेक गोष्टींशी जुळवून घेण्याची सवय आपल्याला असते. शाळा, महाविद्यालय त्याचप्रमाणे घरी अनेक लहान सहान गोष्टींसाठी आपण एकमेकांना समजून घेतो. पण, एकाच ठिकाणी, एकाच वेळी विविध राज्यातील, अनोळखी व्यक्तींसोबत जुळवून घेणे काय असते, याचा अनुभव दिल्लीत आला. त्यातूनच आयुष्यात तडजोड म्हणजे नेमकी काय याचा खरा अर्थ समजला, अशा भावना ऊर्जा हरेश शाह हिने व्यक्त केल्या. दिल्ली येथे झालेल्या गणतंत्र दिन पथसंचलनात ती विदर्भातून सहभागी होणारी एकमेव विद्यार्थिनी आहे. तिने दिल्लीतील अनुभव कथन केले.
तिने सांगितले की, आर.डी. परेडसाठी निवड होणे हीच बाब माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. पथसंचलनाच्या आधी प्रशिक्षण शिबिरात शिस्तीचे महत्त्व समजले. जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे राहण्याची सोय केली होती. विजय चौकात सकाळी 4 वाजता परेडच्या सरावासाठी हजर राहावे लागायचे. दिवसभर विविध कार्यक्रम, प्रशिक्षण, मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम असा रोजचा दिनक्रम असायचा. परेडसाठी देशातील 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. मात्र, 26 जानेवारीला राजपथवर चालण्यासाठी 144 विद्यार्थ्यांचीच निवड होणार होती.
त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत धाकधूक होती. त्यामुळे पाय सुजले, ताप आला, तरी सराव सुरूच ठेवला. शिवराजसिंग शेखावत व कालासिंग या दोन लष्करी अधिकार्‍यांनी आम्हाला प्रशिक्षण दिले. त्यांचे आदेश अद्याप कानात घुमतात. जोश आणण्यासाठी आम्ही त्यांचे आदेश त्यांच्याच शैलीत म्हणायचो. त्यातून ऊर्जा मिळायची व आणखी सराव करू शकलो. रोज सकाळी निघणार्‍या प्रभात फेरीची एका झोनकडे जबाबदारी असायची. ऊर्जा पदवी घेतल्यानंतर बायोइन्फॉर्मेटिक्समध्ये एम.एस्सी. करणार आहे.