आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलाखाली आढळला व्यक्तीचा मृतदेह- दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची पोलिसांनी वर्तवली शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी येथील एका नाल्याच्या पुलाखाली 23 जानेवारीला सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. पुलावरून पडल्यावर तोंड नाल्याच्या गाळात रुतल्याने त्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

शिवणी येथील अक्षय हॉटेलसमोर पुलाखाली प्रात:विधीसाठी गेलेल्या काही जणांना गाळात तोंड रुतलेल्या अवस्थेत कुंभारी येथील गणेश भानुदास इंगळे (45) याचा मृतदेह आढळला. त्यांनी या प्रकाराची माहिती सिव्हिल लाइन्स पोलिसांना दिल्यावर ठाणेदार प्रकाश सावकार ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. गाळातून बाहेर काढल्यानंतर मृतदेहाची ओळख न पटल्याने घातपाताची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात पाठवल्यानंतर खिशात सापडलेल्या चिठ्ठीवर मृतकाच्या साडूचा दूरध्वनी क्रमांक आढळला. त्यावरून पोलिसांनी मृताची ओळख पटवली. पोलिस सूत्रांनी गणेश भानुदास इंगळे नशेत असल्यामुळे त्याचा पाय घसरून नालीत पडला आणि त्याच्या नाकातोंडात गाळ गेल्याने जीव गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

गणेश भानुदास इंगळेला दारूचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपासून घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबाने चौकशीसुद्धा केली होती. गणेश इंगळे मजुरी करत होता. त्याच्यामागे दोन मुले, एक मुलगी, आई व पत्नी आहे. मृतक गणेश इंगळे यांचा साडू तेजराव सिरसाट यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सिव्हिल लाइन पोलिस पुढील तपास करत आहे.