आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारिप-बमसंची उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा, अघोषित युतीला मिळणार मूर्तरूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप-बहुजन महासंघ आणि काँग्रेसमध्ये पत्रव्यवहार झाला. काहीही निश्चित नसताना काँग्रेसकडून जाहीर वाच्यता थांबवण्यासाठी तसेच काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघ यांच्यातील अघोषित युतीला मूर्तरूप देण्यासाठी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत भारिप नेत्यांची 18 फेब्रुवारी रोजी ‘वर्षा’वर प्राथमिक चर्चा होणार आहे.

काँग्रेससोबत युती करण्याबाबत भारिप-बमसं सकारात्मक आहे, अशी माहिती भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार यांनी दिली. ते रविवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार सिरस्कार म्हणाले, भारिप-बमसंद्वारे काँग्रेस पक्षासोबत युतीबाबत बोलणी झाल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होत आहे. मात्र, प्रत्यक्षात युतीबाबत अद्याप कोणतीही चर्चा न झाल्याने जागा मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे युतीबाबतची चर्चा ही अफवा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अकोला भारिप-बमसंला सोडल्याचे वक्तव्य हे आमचे मत न घेता केलेले आहे.

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी काँग्रेस आणि भारिप-बमसंमध्ये युती व्हावी यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. त्यासाठी 13 फेब्रुवारीला माणिकराव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात आम्ही काँग्रेसने वरिष्ठांशी बोलून युतीकरिता आमंत्रित करावे, असा प्रस्ताव दिला होता. त्यावर काँग्रेसने अनुकूलता दर्शवत 18 फेब्रुवारी रोजी प्राथमिक चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. या बैठकीला भारिप-बमसंतर्फे आमदार हरिदास भदे, आमदार बळीराम सिरस्कार आणि प्रा. अविनाश डोळस, तर काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष युतीसाठी प्रयत्नरत असताना जिल्ह्यातील नेते मात्र युतीसाठी खोडा घालत असल्याचा आरोपही आमदार सिरस्कार यांनी केला. या वेळी विभागीय युवक आघाडी अध्यक्ष राजेंद्र पातोडे, जिल्हा महासचिव दिनकर वाघ, गौतम गवई, गजानन गवई, सचिन शिराळे उपस्थित होते.