आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कस्तुरीचा हा दरवळ मनामनांत फुलेल; भारुडकार चंदाताई तिवाडी यांचा विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- समाजात दिमाखात उभी असलेली कुठलीही इमारत पायात रचलेल्या दगडांच्या विश्वासावर, मेहनतीवर उभी असते. मात्र, इमारतीचा भार पेलणारे हे दगड आपले मोठेपण कधी समाजासमोर मांडत नाहीत. कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीने या दगडांचे मोठेपण समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला असून, या कस्तुरीचा हा दरवळ मनामनांत फुलेल, असा विश्वास भारुडकार चंदाताई तिवाडी यांनी व्यक्त केला.

त्यांनी आपले भारुड ‘समजणे कठीण आहे दगडाचे जीवन, दगड कधी सांगत नाही आपले ते मोठेपण’ या ओळीतून आपले विचार मांडले.

येथील संघवी वाडीत 26 ऑगस्टला कस्तुरी चॅरिटेबलचा तृतीय वर्धापन दिन व कस्तुरीरत्न, कस्तुरीभूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास ज्ञानेश्वर महाराज वाघ, पुरस्कारार्थी रंगराव महाराज टापरे, चंदाताई तिवाडी, आमदार वसंतराव खोटरे, डाबकीच्या सरपंच उषा जानोरकर, मोरेश्वर मोर्शीकर, प्राचार्य डॉ. शांताराम बुटे, प्राचार्य पुजा सपकाळ, कस्तुरीचे संस्थापक प्रा. किशोर बुटोले आदी उपस्थित होते. प्रास्ताविकातून प्रा. किशोर बुटोले यांनी कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीची वाटचाल मांडली. यावेळी होतकरू मुलगी दुर्गा सोनोने हिला कस्तुरीच्या वतीने दत्तक घेऊन तिचे शिक्षण, रोजगार व विवाहाची जबाबदारी उचलली. तिचा पालकांसह प्राचार्य शांताराम बुटे यांनी सत्कार केला. त्यानंतर साडेपाच हजारांवर भारुडांचे लिखाण, सादरीकरणासह बेघरांना घर, शिक्षण आदी अनेकविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या पंढरपूरनजीकच्या गोपाळपूर येथील चंदाताई तिवाडी यांना कस्तुरीरत्न तसेच आखतवाडा येथील रंगराव महाराज टापरे यांना कस्तुरीभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान झाला. या पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे होते. तसेच शिक्षण क्षेत्रतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व मोरेश्वर मोर्शीकर यांनाही सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी उपस्थितांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन भावना कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमासाठी राजेश पेठकर, गिरीश वाडेगावकर, विनोद आपोतीकर, रवींद्र साकरकर, प्रा. मेधा कनकेकर, विद्या राऊत आदींनी पुढाकार घेतला.

पुरस्कारार्थी
पंढरपूरनजीकच्या गोपाळपूर येथील चंदाताई तिवाडी यांना कस्तुरीरत्न तसेच आखतवाडा येथील रंगराव महाराज टापरे यांना कस्तुरीभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान झाला.