आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावना गवळींचा 41, मोघेंचा 39 लाख खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघात उमेदवारांनी केलेला खर्च सादर करण्यात आला आहे. या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी सुमारे 1 कोटी 60 लाख 35 हजार रुपयांचा खर्च केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ही निवडणूक कोट्यवधींची ठरली आहे. प्रत्यक्षात मात्र दाखवण्यात आलेल्या रकमेच्या कितीतरी पट खर्च निवडणुकीत करण्यात आला असल्याचे जाणकारांचे मत आहे.

यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात एकूण 26 उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीची मतदान प्रक्रिया 10 एप्रिल रोजी पार पडून त्याची मतमोजणी 16 मे रोजी झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या भावना गवळी ह्या 93 हजार मतांनी विजयी झाल्या. यंदाच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यातच यंदाच्या निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ करीत त्यांना 70 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा दिली होती. यात अनेक गोष्टींचे दरही निश्चित करून देण्यात आले होते. त्या दरानुसारच खर्च सादर करण्याची सक्ती उमेदवारांना करण्यात आली होती. निवडणूक काळात दररोजचा खर्च सादर करण्याची अट उमेदवारांपुढे ठेवण्यात आली होती. सोबतच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दीड महिन्यांच्या आत म्हणजेच 16 जूनपूर्वी अंतिम खर्च सादर करण्यास सांगण्यात आले होते.

या आदेशावरून उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या तपशीलानुसार सर्व 26 उमेदवारांनी मिळून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 1 कोटी 60 लाख 35 हजार 69 रुपयांचा खर्च केला. त्यात निवडून आलेल्या शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांनी सर्वाधिक 40 लाख 64 हजार 533 रुपये खर्च केला. त्यापाठोपाठ काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे यांनी 38 लाख 69 हजार 158 रुपये खर्च केल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ बसपचे बळीराम राठोड यांनी साडेसतरा लाख, मनसेचे राजु पाटील यांनी 14 लाख तर भारिप बहुजन महासंघाचे मोहन राठोड यांनी पावणेबारा लाख रुपये निवडणुकीत खर्च केल्याचे दाखवले आहे.

उमेदवारांनी सादर केलेल्या या खर्चाची पडताळणी निवडणूक निरीक्षकांनी केली आहे. या सर्व खर्चाची देयके आणि त्याचा ताळमेळ तपासून घेण्यात येणार आहे. त्यात काही त्रुटी आढळल्यास त्यासंदर्भात संबंधित उमेदवारावर कारवाईही होण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे.

एका उमेदवारास बजावली नोटीस : उमेदवारांना निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी 16 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यावरून रिंगणात उतरलेल्या 26 पैकी 25 उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीत झालेला खर्च आणि त्याचा तपशील 16 जूनपूर्वी सादर केला. मात्र एका उमेदवाराने त्याचा खर्च 19 जून रोजी सादर केला. त्यामुळे त्या उमेदवाराला निवडणूक विभागाने नोटीस बजावून या संदर्भात उत्तर विचारले होते. त्यानंतर त्यांचा खर्च स्वीकारण्यात आला.

अनेकांचा खर्च 50 हजारांच्या आत : निवडणुकीत एकीकडे काही उमेदवारांनी लाखो रुपये खर्च केले तर दुसरीकडे रिंगणात असलेल्या 26 उमेदवारांपैकी तब्बल 11 उमेदवारांनी लाखो रुपये खर्चाची मर्यादा असतानाही त्यांच्या निवडणुकीचा खर्च हा 50 हजारांपेक्षा अधिक होऊ दिला नाही. त्यामुळे या सर्व 11 उमेदवारांचा खर्च 50 हजारांच्या आत असल्याचे सादर करण्यात आले आहे.
मुंबई कार्यालयात खर्च पाठवणार
४उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि या खर्चाचा तपशील याची पाहणी आणि तपासणी निवडणूक निरीक्षकांनी केली आहे. त्यानंतर आता या खर्चाचा तपशील प्रथम मुंबई आणि तेथून दिल्ली येथे निवडणूक विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. त्या ठिकाणीही या खर्चाची चाचपणी करण्यात येणार आहे.’’
नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी
प्रमुख उमेदवारांचा खर्च असा
उमेदवार केलेला खर्च
भावना गवळी 40 लाख 64 हजार 533
शिवाजीराव मोघे 38 लाख 69 हजार, 158
राजु पाटील 14 लाख 23 हजार 970
बळीराम राठोड 17 लाख 56 हजार 543
अहमद महमुदखान अबरार 3 लाख 78 हजार 955
अहमद परवेज इकबाल 8 लाख 39 हजार 587
मोहन राठोड 11 लाख 67 हजार 014
जांबुवंतराव धोटे 5 लाख 18 हजार 971
इंदुवर राठोड 1 लाख 47 हजार 448
नरेश राठोड 3 लाख 41 हजार 863
सुधाकर घायवान 1 लाख 11 हजार 120
सुरेश मुखमाळे 1 लाख 6 हजार
राजेंद्र गायकवाड 4 लाख 55 हजार 458
प्रशांत सुर्वे 5 लाख 22 हजार 180