आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंदू महाराजचा भंडाफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अंगात शक्ती असल्याचे भासवून अंधर्शद्धेला खतपाणी घालणार्‍या एका भोंदू बाबाचा संभाजी ब्रिगेडने 8 ऑक्टोबरला भंडाफोड केला. कैलास निचळ उर्फ इच्छाधारी हे महाराजचे नाव आहे. जादूटोणाविरोधी कायद्याचा वटहुकूम निघाल्यानंतर ही अमरावती महसूल विभागातील पहिलीच कारवाई आहे.

अकोटरोडवरील सांगवी माहोडी फाटा येथे एका भोंदूने दरबार थाटल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. गजानन पारधी, जिल्हाध्यक्ष पंकज जायले आणि महानगराध्यक्ष पवन महल्ले, सोमू कट्टेकार, गजू कांबळे, नितीन सपकाळ यांना मिळाली. त्यांनी अकोटफैल पोलिसांना सोबत घेत 8 ऑक्टोबरला दरबारावर हल्लाबोल केला. पोलिसांनी कैलास निचळ उर्फ इच्छाधारी महाराजला ताब्यात घेतले. या ठिकाणी पोलिसांना निंबू, अगरबत्ती, दिवे, धागे आढळले. याप्रकरणी महाराजविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम पाचसह इतरही अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

म्हणे, निंबूचे शरबत करतो
भोंदू महाराजकडे निंबू आढळले. याबाबत विचारले असता महाराजने निंबू हे येणार्‍या भक्तांना शरबत देण्यासाठी आहे, असे सांगितले.

फोटोवरून इलाज
भोंदू इच्छाधारी महाराज उर्फ कैलास निचळ याच्याकडे लहान मुले आणि मुलींची छायाचित्रे आढळून आली. या छायाचित्रांवरून तो मुलगा-मुलीचे राशी भविष्य सांगत असे तसेच दुर्धर आजार असल्यास त्यावर उपचारही सांगत असे.

भोंदूने लावला रेट बोर्ड
भोंदू महाराजने दरबारात रेट बोर्डच लावला होता. ‘महाराज स्वत: पैसे मागत नाही. तुम्ही स्वत: 100, 150, 200 रुपये द्यावेत. मात्र, 50 रुपये देऊ नयेत तसेच महाराज घरीसुद्धा येतात’, असे लिहिले होते. भक्तांच्या घरी येण्यासाठी महाराज वेगळे पैसे आकारत असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

पदाधिकार्‍यांशी चर्चा
जादूटोणाविरोधी कायदा नवीनच असल्याने अकोटफैल पोलिसांनी अखिल भारतीय अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे आणि सल्लागार शरद वानखडे यांच्याशी पोलिस ठाण्यात चर्चा केली. या गुन्ह्यात केंद्रीय काळी जादू प्रतिबंधकसह इतरही अधिनियमांच्या कलमांचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली.

काय सांगतो कायदा
भोंदू महाराजांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम पाचअन्वये गुन्हा दाखल होणार आहे. कलम पाचनुसार ‘अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवणे, या शक्तीद्वारे इतरांच्या मनात भीती निर्माण करून धमकी देणे, फसवणे गुन्हा आहे.

भोंदू झाला लखपती
भोंदू महाराजने दोन वर्षांपासून दरबार भरवण्यास सुरुवात केली. यानंतर मात्र त्याच्या आर्थिक परिस्थितीत भरभराट झाली. त्याच्याकडे सद्य:स्थितीत शेत, घर आणि कार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दिली. भोंदू महाराजने कार आणि शेती असल्याची कबुली दिली.