अकोला - जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट को. क्रेडिट सोसायटी लि. ठेवीदारांच्या फसवणूकप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी १३ संचालकांना चांगलाच हिसका दाखवला. पोलिस कोठडीत असताना त्यांच्याकडून अकोल्यातील पाच कोटी रुपयांची आणि जळगावातील ५० कोटी रुपयांच्यावर संपत्ती पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे अकोल्यातील ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.
बीएचअार सोसायटीच्या राज्यात २६४ शाखा आहेत. या शाखांमधून ८०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करावयाच्या आहेत. मात्र, सोसायटीने गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यास असमर्थता दाखवली होती. त्यामुळे राज्यातील ५५ पोलिस ठाण्यांमध्ये पतसंस्थेच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या फेब्रुवारी रोजी जळगाव येथील रामानंदनगर पोलिसांनी संचालक प्रमोद भाईचंद रायसोनी, इंद्रकुमार आत्माराम ललवाणी, सुकलाल शहादू माळी, डॉ. हितेंद्र यशवंत महाजन, मोतीलाल ओंकार गिरी, दादा रामचंद्र पाटील, दिलीप कांतीलाल चोरडिया, सूरजमल भूतमल जैन, भागवत संपत माळी, यशवंत ओंकार गिरी, शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार, राजाराम काशिनाथ कोळी आणि भगवान हिरामण वाघ यांना अटक केली होती. तेव्हापासून ११ पोलिस ठाण्यांनी या संचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची पोलिस कोठडी मिळवली हाेती.
मात्र, यापैकी कोणत्याही पोलिसांनी संचालकांविरुद्ध ठोस कारवाई केली नाही. मात्र, सिटी कोतवाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची पोलिस कोठडी मिळवली आणि यादरम्यान, या सर्व संचालकांची कसून चौकशी केली. संस्थापक संचालक प्रदीप रायसोनी यांना जळगाव येथे पोलिस घेऊन गेले होते. त्यात त्यांनी जळगाव येथील पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाची सात एकर ३० गुंठे जागा, त्यात एक एकर १० गुंठेचे कार्यालय ताब्यात घेतले आहे, अकोला येथील मोहता मिल रोडवरील दोन हेक्टर पाच आर जमीन, गांधी रोडवरील दर्याव हाइट्समधील ९६५.९ चौ.मीटरचे पतसंस्थेचे कार्यालय आणि अकोल्यात वावरणारी पतसंस्थेची इनोव्हा कंपनीची पाच लाख रुपये किमतीची गाडी, अशी एकूण अंदाजे पाच कोटी रुपयांची संपत्ती पोलिसांनी जप्त केली आहे. ही संपूर्ण संपत्ती पोलिसांनी ताब्यात घेऊन ती पतसंस्थेचे अधिकारी प्रसन्नकुमार वैद यांना अटी घालून सुपूर्दनाम्यावर दिली आहे.
१००कोटी रुपयांचे कर्ज नातेवाइकांकडे ; संस्थेने११०० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. ३०० कोटी रुपये नफा राहील, असे संस्थेने वेळोवेळी जाहीर केले होते. असे असताना संस्थेचे १०० कोटी रुपयांचे कर्ज संस्थाचालक, त्यांचे नातेवाईक, व्यवसायांमधील भागीदार यांच्या नावावर आहेत. त्यामुळे कर्ज वसुलीबाबत अडचणी येत आहेत.
सुरू असलेले सेटलमंेटचे व्यवहार हाणून पाडू
संस्थेच्यासंचालक, नातेवाईक संचालकांचे व्यावसायिक भागीदार यांचे कर्जाचे सेटलमेंटचे व्यवहार राजरोसपणे सुरू आहेत. असे सर्व बेकायदा व्यवहार हाणून पाडू, त्यासाठी न्यायालयात दाद मागू. त्यासाठी वेगळ्या तक्रारी पोलिसात दाखल केल्या जातील. .'' विवेकठाकरे, राज्याध्यक्ष,ठेवीदार संयुक्त समिती
१३ आरोपी संचालकांना न्यायालयीन कोठडी
तीन दिवसांपूर्वी जळगाव येथून १३ संचालक आरोपींना अटक केली होती. या आरोपींना मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या आरोपींना आणखी १८ पोलिस ठाणे चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत.
अकोल्यात तीन कोटी १५ लाखांच्या ठेवी
अकोल्याच्या गांधी रोडवरील पतसंस्थेमध्ये सर्व ठेवीदारांच्या कोटी १५ लाख रुपये ठेवी आहेत. त्यात बचत खाते, लॉकरचा समावेश आहे. मात्र, अकोल्यातील गुंतवणूकदार गजानन धामंदे यांच्यासह २३ ठेवीदारांनी पोलिसात तक्रार दिली. ७५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, पोलिसांनी संपत्ती जप्त केल्यामुळे आता इतरही गुंतवणूकदार तक्रारी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.