आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिद्धेश्वर देशमुख हत्याकांड: भाजपचे सांत्वन; शिवसेनेची पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मलकापूरचे सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांच्या कुटुंबीयांचे प्रथम सांत्वन करण्यात भाजपने शिवसेनेला मागे टाकले आहे. सिद्धेश्वर देशमुख यांच्या जागी तातडीने नव्या जिल्हा उपप्रमुखाची नेमणूक करून शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी शेगावातूनच अकोल्याकडे पाठ फिरवली. भाजपच्या प्रदेश नेत्यांनी मात्र खास वेळ काढून मलकापुरात देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

अकोल्यात शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुखाची हत्या होते, त्यानंतर शिवसेनेचे नेते, आमदार दिवाकर रावते अकोल्याजवळ शेगावपर्यंत येतात, तेथेच बैठक घेऊन सिद्धेश्वर देशमुख यांच्या उत्तराधिकार्‍याची नियुक्ती करतात आणि तेथूनच मलकापूर, अकोल्याकडे पाठ फिरवतात, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यात कुठेही एखाद्या शिवसेना कार्यकर्त्याची हत्या झाल्यास मुंबईहून शिवसेना नेत्यांची मोठी फौज त्या गावाकडे लगेच रवाना झाल्याचे आजवर घडले आहे. मलकापुरात मात्र शिवसेनेची फौज तर दूरच शेगावपर्यंत आलेले नेतेही मधूनच मुंबईकडे परतले. मलकापूरचे सरपंच सिद्धेश्वर देशमुख यांच्या हत्येनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मलकापुरात जाऊन (कै.) देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले. शिवसेनेच्या नेत्यांकडूनदेखील असेच सांत्वन करण्याची अपेक्षा अनेक शिवसैनिकांना होती. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सिद्धेश्वर देशमुख यांची 23 ऑगस्टला हत्या झाली. यानंतर शिवसेना नेते, आमदार दिवाकर रावते यांनी शेगाव येथे 25 ऑगस्टला जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी बैठक घेतली.

शिवसेना नेते येणार
शिवसेना नेते व आमदार दिवाकर रावते यांचा शेगाव दौरा थोड्यावेळासाठी होता. त्यामुळे ते अकोल्याला येऊ शकले नाही. शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार संजय गावंडे, माजी आमदार गुलाबराव गावंडे व शिवसेनेच्या इतर स्थानिक पदाधिकार्‍यांनी त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले आहे. येत्या काळात शिवसेनेचे वरिष्ठ नेते सिद्धेश्वर देशमुख यांच्या परिवारास निश्चित भेटतील.
-श्रीरंग पिंजरकर, जिल्हा प्रमुख, शिवसेना.