आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘व्यूह’रचना भाजपच्या नव्या कार्यालयातली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - काँग्रेसच्या मार्गावर असलेल्या माजी आमदारांची कोंडी करण्यासाठी भाजपने व्यापक ‘व्यूह’रचना आखली आहे. या ‘व्यूह’रचनेत भाजपच्या जुन्या नेत्यांचे मनोमिलन करण्याकडे पक्षाचा व नेत्यांचा कल आहे. त्यामुळे आज भाजपचे माजी जिल्हा सरचिटणीस बंडू पंचभाई यांनी पुन्हा भाजप कार्यालयाच्या पायर्‍या चढल्या. भाजप शहराच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थित होते.

काँग्रेस मार्गावर असलेल्या एका माजी आमदारापासून त्यांचे सोबती दूर करण्याची तयारी भाजपने सुरूकेली आहे. पक्षावरील विघ्न दूर करण्यासाठी थेट गणेशाच्या साक्षीने व नव्या वास्तुशास्त्रावर आधारित कार्यालयात हे सर्व घडले. पक्षापासून लांब जाऊन ही पक्षनिष्ठा कायम असलेले बंडू पंचभाई यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवार गोवर्धन शर्मा यांच्या विरोधात दंड थोपटले होते.

त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी चांदेकर भवनातील कार्यालयात त्यांनी पाऊल ठेवले नाही. आज गणपतीपूजन व नूतनीकरण झालेल्या कार्यालयात त्यांनी हजेरी लावल्याने माजी आमदाराला कोंडीत पकडण्यासाठी रचलेली ‘व्यूह’रचना यशस्वी झाली. या कार्यक्रमास खासदार संजय धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांच्यासह अभिजित आळशी, कविता आळशी यांची उपस्थिती होती.

प्रमिलाताई टोपले यांच्या स्मृतींना या वेळी उजाळा देण्यात आला. ताईंनी भाजप उभारण्यात मोलाची मदत केल्याचे खासदार संजय धोत्रे म्हणाले, ‘समन्वयातून पक्षाने प्रगती करावी,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या वेळी आमदार गोवर्धन शर्मा यांनी धावती भेट दिली. अभिजित आळशी, अशोक झंवर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला रणधीर सावरकर, किशोर पाटील, सुमनताई गावंडे, प्रतुल हातवळणे, विलास शेळके आदींची उपस्थिती होती.