आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Sena Make Ready Of Vidhan Sabha In Akola City

विधानसभा : राजकीय घडामोडींना वेग ; भाजपकडे सशक्त पर्याय, शिवसेनेची मात्र शोधाशोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भाजपने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अकोट वगळता इतर विधानसभा क्षेत्रात भाजपकडे सशक्त पर्याय असल्याचे चित्र आहे. मात्र, शिवसेनेला येणा-या निवडणुकीत उमेदवार शोधावे लागणार आहे. सध्या शिवसेनेकडे असलेल्या अकोला (पूर्व) मतदारसंघावरही भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.

अकोटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चांगली ताकद असली तरी तिथे भाजप मात्र तितका प्रभावी नाही. त्यामुळे केवळ अकोट येथे भाजपला सशक्त पर्याय शोधावा लागेल. अकोला (पूर्व) आणि अकोट हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. या मतदारसंघापैकी अकोला (पूर्व) हा शहरी मतदारांशी जोडलेला आहे. अकोला (पूर्व) या मतदारसंघात शिवसेनेला वारंवार पराभव पत्करावा लागला. त्यामुळे युती झाली किंवा नाही झाली, तरीदेखील शिवसेनेला या मतदारसंघावर पाणी सोडण्यास भाग पाडू, अशी भूमिका भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतली आहे.

अकोला (पूर्व) या मतदारसंघावर भाजपचे विधान परिषदेचे आमदार डॉ. रणजित पाटील इच्छुक आहेत. भाजपमधील रणधीर सावरकर, तरुण कार्यकर्ते अ‍ॅड. गिरीश गोखले यांनीही या मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेचे आमदार संजय गावंडे हे अकोट मतदारसंघाचे नेतृत्व करत आहे. भाजपला या मतदारसंघात चांगला उमेदवार शोधण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागेल. येथे अकोटचे राजेश नागमते, तेल्हा-याच्या स्मिता राजनकर यांच्यापैकी एकाचा विचार होऊ शकतो.

यंदा भाजप मूर्तिजापुरात उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या जागेवर सुनील मेश्राम चांगला पर्याय ठरू शकतात. गेल्या काही वर्षांपासून सुनील मेश्राम यांची भाजपशी जवळीक व महापालिकेत त्यांनी भाजप नगरसेवकांमध्ये निर्माण केलेला विश्वास पाहता ते प्रबळ दावेदार ठरू शकतात. गजानन डामरे, गजानन भटकर, बंडू इंगळे, श्रीप्रभू चापके, विजय इंगळे, काँग्रेसमध्ये असलेले एक दमदार नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत.

अकोला (पश्चिम) मतदारसंघातदेखील मोठा बदल अपेक्षित आहे. मात्र, विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा यांनी नकार दिल्यानंतरच हा बदल होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. येथे महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, माजी महापौर अश्विनी हातवळणे, हरीश आलिमचंदानी, अ‍ॅड. मोतिसिंग मोहता हे प्रबळ दावेदार आहेत. बाळापूर मतदारसंघासाठी आमदार डॉ. रणजित पाटील, किशोर मांगटे पाटील, मनोहर राहणे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, विलास पोटे, डॉ. जगन्नाथ ढोणे, उन्मेष जाधव, श्रीकृष्ण मोरखडे आदींनी इच्छा व्यक्त केली आहे.

शिवसेनेला घ्यावा लागेल शोध
अकोट येथील आमदार संजय गावंडे वगळता इतर मतदारसंघात पक्षाला उमेदवार शोधण्यापासूनच कसरत करावी लागणार आहे. अकोला (पूर्व) विधानसभा मतदारसंघासाठी गुलाबराव गावंडे, अ‍ॅड. अनिल काळे, श्रीरंग पिंजरकर, ज्योत्स्ना चोरे, चंद्रशेखर पांडे गुरुजी आदी इच्छुक आहेत. अशी इच्छुकांची नावे इतर मतदारसंघात पक्षाकडे नाही. विधानसभा निवडणुकीत युती न झाल्यास शिवसेनेला मोठी अडचण निर्माण होऊ शकते. दरम्यान, शनिवारी, 5 जुलै रोजी 5 वाजता आयएमए हॉल येथे पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ या अनुषंगाने शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते मार्गदर्शन करणार आहेत.