अकोला- स्वत:मिस्टर क्लीन म्हणणारे राज्यातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीनंतर बिल्डरच्या किती फाइल्स क्लिअर केल्या, असा प्रश्न आम्ही आधीच विचारला होता. त्याच्या आकडेवारीसहीत माहिती आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार देत आहेत. यावरून आम्ही उपस्थित केलेला मुद्दा वैध होता. त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांनीच किती कोटींच्या फाइल्स क्लिअर केल्या कशासाठी याचा खुलासा करावा, असे आवाहन भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे पत्रकारांसोबत संवाद साधताना केले.
चव्हाण यांनी निवडणूकपूर्व काळात अनेक बिल्डरांच्या फाइल्स क्लिअर केल्या, तो मुद्दा भाजपनेच उचलून धरला होता. केवळ आता काँग्रेस राष्ट्रवादीत आघाडी नसल्याने अजित पवार तो मांडत आहेत. याविषयी भाजपनेच आवाज उंच केला होता. त्यामुळे आम्ही उपस्थित केलेला मुद्दा आता त्यांचा सत्तेतील मित्र पक्षच उपस्थित करत असल्याने मुख्यमंत्री यांनी तत्काळ खुलासा करावा, असे आवाहन त्यांनी केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जे आरोप केले गेले ते आम्ही विरोधक म्हणून बाहेरून केले. पण, आता त्यांचा सहकारीच हे आरोप करत आहे. यापूर्वीच मी असा आरोप केला होता.