आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blind Child Lighting In Hut For Diwali Festival In Washim

‘डोळस’ आदर्श: अंध बालकाने पसरवला झोपडीत उजेड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम- स्वत:च्या घरात अठराविश्वे दारिद्र्यात खितपत पडलेल्या एका आठ वर्षीय जन्मत:च अंध असलेल्या बालकाने उत्तम गायन-वादनाच्या लाभलेल्या कलेतून मिळणार्‍या पैशाचा कसा सदुपयोग करावा, याचा ‘डोळस’ आदर्श जगासमोर ठेवला आहे.

या अंध बालकाने गरीब घरच्या मुलांना लोडशेडिंगमुळे अभ्यासात येणार्‍या अडचणी समजून घेत त्यांच्या झोपडीला सौरदिवे देऊन प्रकाशाचा सण म्हणून ओळखल्या गेलेल्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला आहे. तालुक्यातील केकतउमरा या गावातील चेतन पांडुरंग उचितकर हा आठ वर्षीय चिमुकला उत्तम गायन आणि वादन करतो. त्याची कीर्ती दूरवर पसरली. त्याच्या कार्यक्रमासाठी अनेक गावांमधून त्याला सातत्याने आमंत्रण येतात. त्यासाठी चेतन कुठल्याही मानधनाची अट ठेवत नाही, परंतु लोक स्वत:हून पैसे देतात. याच रकमेतून त्याने त्याच्या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना 25 हजार रुपयांचे सौरकंदील घेऊन दिलेत. रविवारी दिवाळीचे औचित्य साधून कुठलाही बडेजाव न करता सुरकंडी या गावातील निवडक गरजू विद्यार्थ्यांना या सौरदिव्यांचे त्याने वितरण केले. चेतनच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य. त्याच्या अंगी उपजतच गायन-वादन या कला आहेत. त्याच्या गरीब वडिलांनी या हिर्‍याला ओळखून पैलू पाडण्याचे काम केले.

चेतन नुसतेच मनोरंजन करतो असे नाही तर जाती निर्मूलन, दृष्टिदान, अंधर्शद्धा, हुंडाबळी, स्वच्छता यासारख्या विषयांवर प्रबोधन करतो. त्यामुळे वाशिमच्या नेत्रदान प्रचार समितीचा तो ‘ब्रॅंड अँम्बेसेडर’ झाला आहे. केवळ जिल्ह्यातच नव्हे तर परिसरातील जिल्ह्यांमध्येही त्याची ख्याती पोहोचली आहे. त्याच्या कार्यक्रमासाठी दूरदुरून तारखा बुक होत आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजक आणि रसिकांनी जे दिले ते मोठय़ा मनाने स्वीकारतो. मात्र, त्याने या पैशाचा संग्रह केला नाही की ते आपल्या वडिलांकडे दिले नाहीत. या पैशातून सौरदिवे विकत घेतले आणि परिसरातील गरीब मुलांना लोडशेडिंगच्या काळात अभ्यास करताना मदत व्हावी म्हणून दिवाळीच्या पर्वावर घरोघरी जाऊन साध्या पद्धतीने त्याचे वितरण केले. आज त्याच्या डोळ्यांत अन् झोपडीत जरी अंधार असला असला तरी त्याच्या प्रखर सामाजिक जाणिवेमुळे गरीब मुलांचे आयुष्य उजळून निघणार आहे. चेतन प्रेरणावाटच बनला आहे.

'बीए, बीपीएड झालेल्या पांडुरंग उचितकर आणि गंगासागर उचितकर या दांपत्याच्या चंद्रमौळी झोपडीत 2005 मध्ये चेतनचा जन्म झाला. जन्मानंतर काहीच महिन्यात लक्षात आले की, चेतन पाहू शकत नाही. पण, याच मुलाला आपले प्रेम मिळावे, या उदात्त भावनेने उचितकर दांपत्याने एकाच मुलावर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली.'