आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला, आपल्या अंगणातील पक्ष्यांची नोंद घेऊ या!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- निसर्गसंवर्धन चळवळ अधिक व्यापक करावयाची असेल तर सर्वसामान्यांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे माणूस निसर्गापासून दुरावतो आहे. त्यासाठी ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट (जीबीबीसी)’ म्हणजेच आपल्या अंगणातील पक्ष्यांची गणना हा उपक्रम राबवण्यात येत अाहे. यंदा १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या पक्षी प्रगणनेला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचा पाठिंबा असून, त्यांनी सर्वसामान्यांचाही सहभाग वाढवण्यावर भर दिला आहे.
भारतीय निसर्गप्रेमी 2013 पासून या पक्षी प्रगणनेत सहभागी होतात. हा चार दिवसीय उपक्रम सर्वांसाठी खुला असून, भारतभरातील शेकडो पक्षी निरीक्षक यामध्ये सहभागी होऊन पक्ष्यांची माहिती, नोंद ऑनलाइन करतात. जगभरात एक लाखांवर पक्षी निरीक्षक यामध्ये सहभागी होतात. मागील वर्षी देशात एक हजार पक्षी निरीक्षकांनी ८०० पक्षी प्रजातींची नोंद केली होती, ही इतर कुठल्याही देशापेक्षा मोठी होती. यामध्ये चिमणी, कावळा, कबुतर यांची सर्वाधिक नोंद होती. मात्र, त्यासोबतच दुर्मिळ पक्षी प्रजाती जसे ब्ल्यू नॅपड पिट्टा (नवरंग) याचीही नोंद झाली. या उपक्रमामुळे भारतातील पक्ष्यांची योग्य पद्धतीने नोंद करणे शक्य होऊन त्यांच्या संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे नियोजन करणे शक्य होते.
उपक्रमात असे व्हा सहभागी
आपल्याप्रांगण, परिसरातील पक्ष्यांच्या प्रगणनेच्या उपक्रमात एकाच भागात १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ दिसणाऱ्या प्रत्येक पक्ष्याची नोंद घेण्यात येईल. तसेच ही नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘www.ebird.org’ या वेबसाइटवर टाकता येईल. उपक्रमात सहभागी होणारी व्यक्ती कितीही पक्ष्यांच्या यादी अपलोड करू शकते. चार दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या यादी टाकता येतील. अधिक माहितीसाठी ‘www.birdcount.in’ या वेबसाइटवर क्लिक करता येईल, अशी माहिती बीएनएचएस संस्थेचे समन्वयक व्यवस्थापक अतुल साठे यांनी दिली आहे.