आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीओटीतून होऊ शकतो विकास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - खड्डे असलेले रस्ते, बंद पथदिवे, उजाड उद्याने, कचर्‍याच्या ढिगामुळे वाढलेली अस्वच्छता यामुळे शहराची अवस्था बकाल झाली आहे. त्यामुळे शहराच्या विकासकामांचा विषय काढला की, निधीचे कारण पुढे करण्यात येते. मात्र, बीओटी तत्त्वातूनही शहराचा कायापालट होऊ शकतो. शहर विकासाच्या दिशेने नेण्यासाठी बीओटीच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, त्यांना सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. मुंबई-ठाण्याच्या धर्तीवर अकोल्यातही बीओटी तत्त्वावर विकास प्रकल्प राबवण्याची अपेक्षा अकोलेकरांनी व्यक्त केली आहे.

शहर विकासासाठी महापालिकेला 26 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ‘आकाश फाटले असताना थिगळं लावायची कुठे’, असा प्रश्न सत्ताधार्‍यांपुढे या निधीच्या नियोजनावरून निर्माण झाला आहे. निधीच्या वाटपावरून नगरसेवकांमध्ये रस्सीखेचही सुरू झाली. शहर विकासासाठीचा 26 कोटींचा निधी हा पुन्हा एकदा त्याच मूलभूत सुविधांवर खर्च करण्यात येणार असल्याचे सत्ताधार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये ट्रॅफिक सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, सांस्कृतिक भवन म्हणून पर्याय असलेल्या खुले नाट्यगृहाचा विकास, पाण्याच्या टाक्या, भाजी बाजाराची स्वच्छता, वाहनतळाचे झोन, उद्यानाचा विकास, दोन कि.मी.वर स्वच्छतागृहांची निर्मिती आदी विकास कार्य करण्याचा मानस सत्ताधार्‍यांनी व्यक्त केला आहे. यातील बहुतांश विकास कार्य बीओटी तत्त्वावर करता येऊ शकतात. त्यासाठी शहरात अनेकवेळा प्रयत्नही झाले. मात्र, मनपा प्रशासन व सत्ताधार्‍यांकडून मिळालेल्या असहकार्यामुळे बीओटी तत्त्वावर अकोल्यात प्रकल्प राबवण्यात अपयश आले आहे. ट्रॅफिक सिग्नल, खुले नाट्यगृहाचा विकास, चौकांचे सौंदर्यीकरण, उद्यानांचा विकास, स्वच्छतागृहे आदी कार्य होऊ शकते.

शहरातही बीओटी तत्त्वावर काही प्रकल्प राबवण्यात आले आहेत. त्यापैकी काही यशस्वी ठरले, तर अनेक प्रकल्पांमध्ये अपयशाचा सामना करावा लागला. शहरातील बहुतांश उद्याने बीओटी तत्त्वावर चालवण्यासाठी देण्यात आले आहेत. याशिवाय मनपाच्या अनेक शाळांही बीओटी तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्यातील नेहरू पार्क अकोल्याच्या नावलौकिकात भर घालतो. 2000 मध्ये लोकसहभागातून चौकांच्या सौंदर्यीकरणाचा कायापालट झाला असून, आता ते कुरूप झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिशादर्शक दिवे (सिग्नल) व्यवस्था कोलमडली आहे. वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीत शहराचा विकास करण्यासाठी महापालिकेकडून निधीची कमतरता असल्याचे मत सत्ताधारी व प्रशासनाकडून व्यक्त केले जाते.

मनपाने सकारात्मक निर्णय घ्यावा
निधीच्या नावावर ओरड करण्यापेक्षा मनपाने सकारात्मक निर्णयाचे पाऊल उचलल्यास बीओटी तत्त्वावर शहराचा सर्वांगीण विकास होऊ शकतोत्यासाठी पाऊल उचलणे आवश्यक आहे.’’ बी. एस. देशमुख, संचालक, नेहरू पार्क.

बीओटीला पर्याय नाही
शहराचा विकास करून त्याची देखभाल व दुरुस्तीसाठी बीओटीशिवाय दुसरा पर्याय नाही. शहरातील विकास करून त्याची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी बीओटी तत्त्वावर प्रकल्प देण्याचा विचार करता येईल. त्यामुळे विकासासाठी बीओटी महत्त्वाचे आहे. धैर्यवर्धन पुंडकर, समन्वयक, भारिप-बमसं, अकोला.

प्रशासन निश्चितच सहकार्य करेल
शासनाकडे निधी मागण्यापेक्षा बीओटी किंवा लोकसहभागातून शहराचा विकास ही संकल्पना उत्कृष्ट आहे. बीओटी तत्त्वावर किंवा लोकसहभागातून शहराचा विकास करण्याचे निश्चित केल्यास जिल्हा प्रशासन पूर्ण सहकार्य करेल.’’ अरुण शिंदे, जिल्हाधिकारी, अकोला.