आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकीदारांवर आता दाखल होणार फौजदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - दूरसंचार विभागाच्या सेवांचा लाभ घेऊन प्रदीर्घ कालावधीपासून देयके थकवणारे जिल्ह्यातील १७ हजार ग्राहक दूरसंचार विभागाच्या दिल्ली स्थितीत केंद्रीय दक्षता पथकाच्या (व्हिजिलन्स टीम) रडारवर आले असून, यातील मोठ्या रकमा थकवणाऱ्या ग्राहकांवर कोणत्याही क्षणी फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
त्या अनुषंगाने दिल्लीस्थित व्हिजिलन्स पथकाने मुंबई येथील कार्यालयाच्या साहाय्याने जिल्हा स्तरावरील कार्यालयांना अनुषंगिक आदेश निर्गमित केले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात बीएसएनएलचे जवळपास एक लाख मोबाइल ग्राहक आणि ४० हजार लँडलाइन ग्राहक आहे. यापैकी जवळपास १७ हजार ग्राहकांकडे गेल्या चार ते पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर देयके प्रलंबित आहे. परिणामस्वरूप जिल्हा स्तरावरील व्हिजिलन्स पथकातील अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भातील संपूर्ण गोपनीय माहिती संकलित करत मुंबई कार्यालयास पाठवली आहे. दिल्लीस्थित केंद्रीय पथकाकडून वाढत्या दबावामुळे या ग्राहकांकडून थकित देयकांची वसुली करण्याची मोठी जबाबदारी दूरसंचार विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर येऊन पडली आहे.
परिणामस्वरूप गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील या थकबाकीदार ग्राहकांकडून थकित देयकांचा भरणा त्वरित व्हावा, या भूमिकेतून दूरसंचार विभागाने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार गत दोन महिन्यात दूरसंचार विभागाने जवळपास दोन लाख रुपयांचे थकित देयके वसूल केले आहे. परिणामी, नजीकच्या जिल्ह्यांच्या तुलनेत थकबाकी वसुलीमध्ये बुलडाणा दूरसंचार विभाग (खामगाव) काहीसा आघाडीवर असल्याचे दिसत आहे. दूरसंचार विभागाकडून ग्राहक हिताला प्राधान्य दिल्या जात आहे.
दोन लाखांची केली वसुली
दूरसंचार विभागाचे जिल्ह्यात मोबाइल लँडलाइनधारक मिळून जवळपास दीड लाख ग्राहक आहेत. यापैकी १७ हजार थकबाकीदार ग्राहकांकडे दूरसंचार विभागाचे ३५ लाख रुपये थकबाकी असून, दोन महिन्यांपासून ही थकबाकी वसुलीचे युद्धपातळीवर सध्या काम होत आहे. यापैकी दोन लाख रुपये वसूल करण्यात दूरसंचार विभागास यश आले आहे. तरीही दूरसंचार विभागाला मोठे उद्दिष्ट गाठायचे आहे.
बड्या ग्राहकांना नोटीस बजावणार
थकबाकी भरणाऱ्या बड्या ग्राहकांना फौजदारी गुन्हे दाखल करण्यासोबतच त्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट करण्याचे निर्देशही केंद्रीय पथकाकडून प्राप्त झाले आहेत. येत्या काही काळात त्या अनुषंगाने प्रक्रिया पूर्णत्वास जाणार असून, फौजदारी गुन्हे दाखल झाल्यानंतर अशी प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बड्या थकबाकीदार ग्राहकांचेही सध्या धाबे दणाणले आहे.
सरासरी १८ हजार रुपये थकित
दूरसंचार विभागाच्या थकबाकीदारांमध्ये प्रामुख्याने १५ हजार रुपयांपासून ते २१ हजार रुपयापर्यंतच्या मोठ्या रकमा थकवणारे ग्राहक आहे. त्यामुळे अशा ग्राहकांची माहिती संकलित करून ती दिल्लीस्थित केंद्रीय व्हिजिलन्स पथकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. दिल्ली येथूनच या मोहिमेची सूत्रे हालत असून देयके भरावी लागणार आहेत.
नेट सर्फिंगसह कॉल रेकॉर्डचीही डाटा तपासणी
व्हिजिलन्स पथकाने थकबाकीदार ग्राहकांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवरून तथा लँडलाइनवरून केलेल्या नेट सर्फिंग सह ज्या क्रमांकावर कॉल केलेले आहेत, त्याची इत्थंभूत माहितीही दूरसंचार विभागाने गोळा केली आहे. परिणामस्वरूप फौजदारी गुन्हे दाखल करताना किंवा प्रकरणे न्यायप्रविष्ट करताना त्यात व्यत्यय किंवा अडचणी येऊ नये ही दूरसंचार विभागाची भूमिका आहे. प्रत्येक जोडणीचे रेकॉर्ड काढण्यात आले.
१०० टक्के वसुलीस प्राधान्य
दूरसंचार क्षेत्रात खासगी कंपन्यांनीही त्यांचा ग्राहक वर्ग निर्माण केला आहे. त्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासोबतच १०० टक्के थकबाकी वसुलीला आता दूरसंचार विभागाने प्राधान्य दिले आहे. त्यातच बीएसएनएलचे संपूर्ण देशात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहे. त्याचा फायदा बीएसएनएललाच मिळावा, या दृष्टिकोनातूनही सध्या बीएसएनएल आक्रमक झाल्याचे दिसून येते. सेवा देत असतानाच वसुलीकडेही लक्ष दिले जात आहे.