आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पातूरची बीएसएनएल सेवा झाली विस्कळीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर- बीएसएनएल सेवेमध्ये नेहमीच अडथळा येऊन सेवा मिळत नसल्याने पातूरकर त्रस्त झाले आहेत. सेवा सुरळीत करण्यासाठी बीएसएनएल कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. या परिस्थितीत पातूरचे नवनियुक्त बीएसएनएलचे अभियंता सुपे यांना दाखवा हो, असा आर्त टाहो नागरिक फोडत आहेत.शहरासह तालुक्यात ऑनलाइन नोकरीसाठी अर्ज भरणारे विद्यार्थी, सेतू केंद्रातून शेतकरी तसेच इतरांची महत्त्वपूर्ण कामे ठप्प पडत आहेत. समस्या ही वादातच असून, त्याचे निराकरण करण्यासाठी दाद मागावी तर कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आपल्या खात्यातील आपले पैसे ना बँकेतून मिळत नाहीत तर एटीएममध्येही मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. बीएसएनएल सेवेवरच सर्वांची मदार आहे. परंतु, अखंड सेवा मिळत नसल्याच्या दु:खद प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सेवा सुरळीत होईल, अशी आश्वासने येथील कर्मचारी तेलगोटे देतात. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून दोन दिवस नागरिक धीर धरतात. मात्र, सेवा काही सुरळीत केली जात नसल्याने कर्मचारी तेलगोटे व अभियंता सुपे यांच्याबाबत नागरिक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. वारंवार अभियंता सुपे यांचे नाव ऐकल्यानंतरही सहा महिन्यांपासून त्यांचे नागरिकांना दर्शन झाले नसल्याचे बोलले जात आहे. सद्य:स्थितीत दहावी व बारावीचे निकाल लागलेले असून, शैक्षणिक कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. सेतू केंद्रात शेतकर्‍यांचीही गर्दी होत असून, त्यांची कामे अपूर्ण राहत आहेत. कृषी विभागाशी असलेला शेतकर्‍यांचा संवाद बंद पडला आहे. राष्ट्रीय बँकांमध्येही कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना आठ ते दहा दिवसांचा विलंब होत आहे.

लोकप्रतिनिधींचे उदासीन धोरण : या प्रकाराबद्दल लोकप्रतिनिधींची गंभीरता दिसून येत नाही. याबाबत त्यांचे उदासीन धोरण असल्याचे नागरिक बोलत आहेत. वास्तविक पाहता बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाल्यानंतर जनता वैतागली असताना लोकप्रतिनिधींनी तत्काळ दखल घ्यायला हवी होती. मात्र, गरीब कष्टकर्‍यांच्या मताधिक्यावर निवडून येऊन त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकही संतापून गेले आहेत.