आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेला मिळाले खूप, खर्च मात्र काहीच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गेल्या वर्षी मनपाला खूप मिळाले. परंतु, खर्च करण्यात व मंजुरी मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरले. एप्रिलमध्ये विकासासाठी 26 कोटी मिळाले. पण, निधी खर्चात व समस्या सोडवण्यात प्रशासनाला अपयश आले. प्रशासन, पदाधिकार्‍यात समन्वय नसल्याने सत्तारूढ महाआघाडीत बिघाडीने शहराची अवस्था बिघडली आहे.

शहराचा विकास हा महापालिकेवर अवलंबून आहे. पण, शहरातील रस्त्यांची चाळणी अतिवृष्टीने झाली. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आलेला निधी खर्च करण्यात महापालिका तिजोरीतील खणखणाट कारणीभूत ठरला. निधी असताना तो खर्च करण्यात महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी हे गेल्या काळात अपयशी ठरले.

महापालिका हद्दीत 26 कोटींची विकासकामे करण्यासाठी तितकाच निधी महापालिकेत नसल्याने विकासकामे ठप्प झाली. कर्मचार्‍यांचा झालेला संप आणि त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे वेतन न झाल्याने निर्माण झालेली अडचण पाहता मनपात येणारा निधी जातो कुठे, असा प्रश्न निर्माण होतो. शहर विकासासाठी 26 कोटी आणि त्यानंतर अतिवृष्टीने खराब झालेल्या रस्त्यांसाठी 15 कोटी असा निधी प्राप्त झाला असताना तो खर्च करण्यात मात्र प्रशासन अपयशी ठरले आहे.

येथे सक्षम अधिकारी पाठवण्यात गेल्या वर्षभरात राज्य शासनाने दखल घेतली नाही. वर्षभरात आलेला काही कोटींचा निधी पाहता तीच काय ती जमेची बाजू आहे. पण, त्याच वेळी महापालिका हद्दीत असलेल्या भूमिगत गटार योजनेसाठी आलेला निधी पाहता राज्य शासनाने तो परत मागितल्याची नामुष्की प्रशासनावर आली होती. त्यामुळे शहराचा विकास कसा होणार, असा महत्त्वपूर्ण प्रश्न सर्वांसमोर आहे. शहर विकासासाठी आता अतिरिक्त निधी कसा मिळेल, याची तयारी होत असताना स्थानिक संस्था निधीची वसुली सुरू असल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. ती सुधारण्यासाठी शासनाने अतिरिक्त निधी द्यावा, अशी होणारी मागणी शासनाकडून पूर्ण होते की नाही, असा प्रश्न सर्वांच्या मनात कायम आहे.

त्यामुळे येत्या वर्षात आलेला निधी सुनियोजितपणे खर्च करत लोकांच्या समस्या सोडवण्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. प्रशासन ही मागणी कधी पूर्ण करणार, असा प्रश्न कायम आहे.