आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इमारत कोसळली; जिल्हा आपत्कालीन पथकाला खबरही नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील खंगरपुरा भागात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास मोहम्मद हारुण जुसब तबानी यांची दोन मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
काळजाचा थरकाप उडवणार्‍या या घटनेची माहिती जिल्हा आपत्कालीन पथकाला नव्हती. कानलकी चाळीमध्ये मोहम्मद हारुण जुसब तबानी हे 1977 पासून वास्तव्यास आहेत. लोड बेअरिंग पद्धतीचे हे बांधकाम केले होते. सायंकाळी मोहम्मद हारुण जुसब तबानी हे कुटुंबीयांसोबत बसलेले असताना अचानक भिंती हलत असल्याचे जाणवले. काही कळायच्या आत अचानक घराचे छत कोसळू लागले. प्रसंगावधान साधत त्यांनी व त्यांच्या मुलाने घरातील सदस्यांना ताबडतोब बाहेर काढायला सुरुवात केली. दरम्यान, भिंतीही पडू लागल्या. पंधरा ते वीस मिनिटांच्या आत मोठ्या शिताफीने त्या दोघांनी सर्व कुटुंबीयांना बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही इमारत माजी राज्यमंत्री अजहर हुसेन यांच्या घराच्या बाजूलाच आहे. सुदैवाने आजूबाजूच्या इमारतींना धक्का पोहोचला नाही.

तहसीलदारही अनभिज्ञ : शहरामध्ये एक इमारत कोसळण्याची घटना घडते. मनपाचे उपायुक्त व आपत्कालीन यंत्रणा त्याठिकाणी पोहोचते. तरीसुद्धा घटनेची माहिती तहसीलदार संतोष शिंदे यांच्यापर्यंत पोहोचत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे शहर व तालुक्यात घडणार्‍या नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी महसूल प्रशासनाला सोयरसूतक नाही, हेच यानिमित्ताने पुढे आले आहे.
भागो, भूकंप हो गया : घर पडत असल्याची वार्ता परिसरात वार्‍यासारखी पसरली. नागरिकांनी एकच कल्लोळ करीत भागो भाई, भूकंप हो गया, अशी ओरड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. मात्र, सुज्ञ नागरिकांनी धाव घेत तसे काही नाही, फक्त हीच इमारत कोसळत असल्याची माहिती नागरिकांना दिली.
महापालिकेच्या पथकाची धाव : उपायुक्त दयानंद चिंचोलीकर, अग्निशमन अधिकारी रमेश ठाकरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करीत घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी मोहम्मद हारुण जुसब तबानी यांनी अधिकार्‍यांना माहिती दिली.
आपत्ती व्यवस्थापन पथक कुंभकर्णी झोपेत : जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. मात्र, या घटनेची कानोकान खबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला नसल्याचे आढळून आले. घटनास्थळी महापालिकेचा अग्निशमन विभागाशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा दिसून आली नाही.

फोटो - अजहर हुसेन यांच्या बंगल्याच्या बाजूला गुरुवारी सांयकाळी इमारत पडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.