आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुलडाण्यात होणार रंगतदार लढत; काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळच्या नावावर शिक्कामोर्तब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - मागील काही दिवसांपासून बुलडाणा मतदारसंघात कॉंग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती लिक झाली होती. त्यामुळे कॉंग्रेस पक्षातील अन्य इच्छुक उमेदवारांनी सपकाळ यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी विरोध केला होता. बुलडाणा मतदारसंघात विरोध करणाऱ्या विरोधकांच्या तक्रारीला तिकडे वरिष्ठांनी कचऱ्याची टोपली दाखवली. इकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पर्धेत असणाऱ्यांना पराभवाची धूळ चारली.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वी अनेकांनी उमेदवारीसाठी कंबर कसली होती. यात नेहमीच चर्चेत असणारी मंडळी धृपदराव सावळे, संजय राठोड, विश्वनाथ माळी, डॉ. मधुसूदन सावळे, एकनाथ खर्चे, गणेश राजपूत, मिनल आंबेकर, जयश्री शेळके, अंकुश वाघ, योगेंद्र गोडे आदींचा समावेश होता. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी ही विविध दिशेला तोंड असणारी मंडळी एकत्र येऊन उमेदवारीसाठी आपल्यातीलच एकाला उमेदवारी द्यावी अशी मागणी करत होती. या संदर्भात वरिष्ठ स्तरावर पत्र देखील पाठवले होते. राज्यातील जिल्ह्यातील सर्व परिस्थिती पाहता अंतीम क्षणी वरिष्ठांनी सपकाळ यांच्याच नावावर शिक्का मारून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मागील १५ दिवसापासून बुलडाण्यात होत असलेल्या काँग्रेस विरुध्द कॉंग्रेस परिस्थितीनंतर एकनिष्ठ कार्य करणारे हर्षवर्धन सपकाळ यांना उमेदवारी मिळाली.
शिवसेनेच्यावतीने आमदार विजयराज शिंदे यांचे नाव आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे यांचे आवाहन कॉंग्रेसकडून पेलण्यासाठी कोण उभा राहणार याकडे सर्वाच्या नजरा लागल्या होत्या. सपकाळ यांचे नाव जाहीर होताच ही लढत रंगतदार होणार आहे. बुलडाण्यात घटस्थापनेचा मुहूर्त पाहता आमदार विजयराज शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दोन मतदारसंघांवर प्रश्नचिन्ह
जिल्ह्यातीलसात विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघ हे कॉंग्रेसच्या वाटयाला आलेले आहेत. यात खामगाव, चिखली, बुलडाणा, जळगाव जामोद, मलकापूर या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. यातील खामगाव, चिखली बुलडाणा येथील उमेदवारांची नावे कॉंग्रेस पक्षाने आपल्या पहिल्या यादीत जाहीर केली आहेत. मात्र आता मागे जळगाव जामोद मलकापूर हे दोन क्षेत्र शिल्लक आहेत. नुकतेच निर्धार मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने या दोन्हीपैकी एक मतदारसंघ आपल्याला मिळावे अशी मागणी केली होती. त्यामुळे या दोन्ही पैकी कोणती जागा राष्ट्रवादीच्या वाटयाला जाते, की दोन्ही ही जागा कॉंग्रेसच्याच ताब्यात राहतात याबाबत शंका व्यक्त होत आहे. दरम्यान,राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी निश्चित झालेली नाही. त्यामुळे नेमके काय होणार याचा अंदाज वर्तवणेे सध्यातरी कठीण झाले आहे. स्वतंत्रपणे निवडणुका झाल्यास सर्वच पक्ष मैदानात उतरतील, असे चित्र निर्माण झाले आहे.
रणनीती ठरणार महत्त्वाची
विधानसभानिवडणुकीत आमदार विजयराज शिंदे हे तीनवेळा निवडून आलेले आहेत. या तिन्ही वेळा त्यांची लढत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवारासोबतच झाली. १९९५ मध्ये कॉंग्रेस पक्षाच्या वतीने स्व. डॉ. राजेंद्र गोडे यांना संधी मिळाली होती. नंतर गोडे यांना ३९०९६ एवढे मते मिळाली तर शिंदे यांना ४८८४२ मते मिळाली होती. १९९९ मध्ये आमदार शिंदे यांचा कॉंग्रेस पक्षाचे धृपदराव सावळे पराभव केला होता. तर २००४ मध्ये कॉंग्रेसचे मुख्यत्यारसिंग मोरे यांनी आमदार विजयराज शिंदे यांना झुंज दिली होती.
२००९ मध्ये पुन्हा धृपदराव सावळे यांना कॉंग्रेसच्यावतीने संधी मिळाली होती. या निवडणुकीतही आमदार शिंदे यांनी विजय मिळवला. अशाप्रकारे मागील चार पंचवार्षिक निवडणुकीत आमदार विजयराज शिंदे यांना कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात निवडणूक लढण्याचे अनुभव आले आहे. या अनुभवातूनच त्यांनी एक आपली रणनीती तयार केली. यंदाही त्यांना मुकाबला काँग्रेस पक्षाशी होणार आहे. मात्र सर्वात तरुण वयात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या उमेदवाराशी त्यांची लढत होणार आहे. सपकाळ यांचा राजकारणाचा अनुभवही दांडगा आहे. त्यामुळे यावेळी शिवसेनेचे आमदार शिंदे आपल्या रणनीतीत बदल करतील अशी चर्चा राजकीय तज्ज्ञात आहे.