आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुलडाणा नगरपालिकेची ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - केंद्रसरकारच्या स्मार्ट सिटी उभारण्यासंदर्भातील प्रस्तावावर पुढील दोन दिवसांत विचार होऊन अनुषंगिक शहरांची निवड होण्याची शक्यता पाहता बुलडाणा शहराचा स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत समावेश व्हावा, या दृष्टीने जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी ३० जानेवारीला अंतिम मंजुरी दिलेल्या ‘सिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट’च्या आधारावर बनवण्यात आलेला प्रस्ताव ३१ जानेवारीला नगरविकास संचालनालयास ई-मेलद्वारे सादर करण्यात आला आहे.

दरम्यान, बुलडाणा शहराच्या ५० वर्षांच्या वाढीचा, विकासाचा आढावा घेऊन बनवण्यात आलेले व्हीजन डॉक्युमेंटचे (सिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट) काम पूर्ण झाले असून, एकूण पाच टप्प्यात या प्रोजेक्टअंतर्गत करावयाच्या कामांचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) बनवण्यास वडोदरा येथील ए. एन. जे. पॉवर टेक्नॉलाजी या कंसल्टंट कंपनीने प्रारंभ केला आहे. १० फेब्रुवारीपर्यंत पहिल्या फेजमधील जवळपास १६ कामांचा हा डीपीआर बनवण्यात येणार असून, तो जिल्हाधिका-यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. बुलडाणा शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित व्हावे या उद्देशाने जिल्हाधिका-यांनी नगराध्यक्ष टी. डी. अंभोरे यांच्या पुढाकारातून आणि जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय असा ८४ एजन्सीच्या सूचना ग्राह्य धरून कन्सल्टंट कंपनीच्या माध्यमातून नोव्हेंबर २०१४ पासून व्हीजन डॉक्युमेंटेशनच्या कामास प्रारंभ केला होता. ३१ ऑक्टोबरला या कामाची वर्कऑर्डर झाली होती. २२ जानेवारी २०१५ रोजी जिल्हाधिका-यांसमोर त्याचे सादरीकरण झाल्यानंतर त्यात सुचवलेल्या बदलांच्या आधारावर ३० जानेवारीला जिल्हाधिका-यांनी या सीडीपीला अंतिम मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने ३१ जानेवारीला पालिका प्रशासनाने जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून नगरविकास संचालनालय आणि आयुक्त स्तरावर हा प्रस्ताव थेट ई-मेलद्वारे पाठवला आहे. दरम्यान, नगराध्यक्षांनी गृहराज्यमंत्र्यांचीही भेट घेतली.

१६ कामांच्या डीपीआरला प्रारंभ
सीडीपीमधीलपहिल्या टप्प्यातील १६ कामांच्या डीपीआरला ३१ जानेवारीपासूनच कन्सल्टंट कंपनीने प्रारंभ केला असून, १० फेब्रुवारीपर्यंत हा डीपीआर जिल्हाधिका-यांना सादर करण्यात येईल, असे संकेत नगराध्यक्षांनी दिले आहेत. पहिल्या टप्प्यात पालिकेची नवीन इमारत, कर्मचारी संकूल, सांस्कृतिक भवन, स्पोर्ट काॅम्प्लेक्स, उद्यान, क्रीडांगणाचा विकास, फिश मटन मार्केट, शाॅपिंग सेंटर, शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण, शेरीवेल परिसराचा विकास या कामांचा सविस्तर प्लॅन बनवण्यात येत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत बुलडाण्याचा समावेश झाल्यास पहिल्या टप्प्यात या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

सिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्टअंतर्गत बुलडाणा पालिकेची संकल्पित इमारतीचा सध्या डीपीआर तयार करण्यात येत आहे.


नगराध्यक्ष अंभोरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मानवविकास निर्देशांकाच्या बाबतीत पिछाडीवर असलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा पालिकेचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश व्हावा, याची कारणमिमांसा करणारे पत्र नगराध्यक्ष टी. डी. अंभोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील, पालकमंत्री एकनाथ खडसे यांना पाठवले आहे.