आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CA CPT Exam Gaurav Deepak Shravagi Topper From Akola

‘तुझे सुरज कहूँ या चंदा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज..’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - तुझे सुरज कहूँ या चंदा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दूलारा.. या गीतातून गौरवची आई सीमा श्रावगी यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत मुलाच्या यशाबद्दल भावोद्गार काढले.

सीएच्या परीक्षेत देशात पहिला आलेल्या गौरवच्या यशाने त्यांना शब्द सुचत नव्हते, त्यांनी ‘एक फुल, दो माली’ या चित्रपटातील गीतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असा प्रकार श्रावगी परिवारासोबत झाला. सीएच्या परीक्षेत देशात पहिला आलेल्या गौरवचे नाव ठेवताना त्याची आजी सीता श्रावगी यांनी पाहिलेली दूरदृष्टी आज त्यांच्यासह परिवारातील सर्वांना अनुभवता आली, अशी प्रतिक्रिया ‘दिव्य मराठी’शी बोलताना गौरवची आई सीमा श्रावगी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गौरवचे वडील दीपक श्रावगी डॉक्टर असून, ते आता अकोट येथे वडिलोपाजिर्त पद्धतीने शेती आणि ऑइल मिल सांभाळतात. गौरवची आई सीमा या गृहिणी आहेत. गौरवला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्समध्ये अभियंता व्हायचे होते. पण, पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही, असे कळल्यानंतर त्याने नागपूर येथे पुढील शिक्षण घेत सीए होण्याचा मानस व्यक्त केला.

दृढ निश्चय करत गौरवने नाव सार्थक ठरवल्याचे भावोद्गार त्याची आई सीमा श्रावगी यांनी काढले. लहानपणापासूनच गौरव हुशार असून, दहावीत त्याला 90 टक्के गुण प्राप्त झाले होते. बारावीत त्याने गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवत 94 टक्के गुण मिळवले होते. अभ्यासासोबत त्याने इतरही आवडीनिवडी जोपासल्या. क्रिकेट त्याचा आवडता खेळ असून, सचिन तेंडुलकर त्याच्यासाठी आदर्श आहेत. टीव्हीवर डिस्कव्हरी चॅनल पाहण्याची त्याला आवड आहे.

मेरा मन तडप रहा हैं
गौरव नागपूरला,आई-वडील अकोटला असल्याने सीमा श्रावगी यांना गहिवरून आले होते. गौरवला भेटण्यासाठी त्यांनी ‘मेरा मन तडप रहा हैं..’ असे म्हणत, मुलाला भेटण्यासाठी पंख असते तर उडत गेली असती असे म्हणत भावना प्रकट केल्या.

‘ग’वरून झाला गौरव
गौरवच्या जन्मापूर्वी आजी सीता श्रावगी यांनी शेगाव संत गजानन महाराजांना नातवासाठी नवस केला, मुलगा झाल्यास गजानन महाराजांच्या नावातील आद्याक्षरावरून नाव ठेवेल. नवसानुसार गौरव हे नाव ठेवल्याचे त्याची आजी सीता श्रावगी यांनी सांगितले.

( फोटो : अकोट येथील रहिवासी गौरव श्रावगीचे आई वडील, आजी आजोबांसह परिवारातील सदस्य.)